चारित्र्यावर संशय; 'त्याने' झोपलेल्या बायकोच्या चेहऱ्यावर टाकले उकळते तेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2021 19:29 IST2021-10-25T10:44:50+5:302021-10-25T19:29:23+5:30
नागपुरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पंचशील नगरमध्ये एका पतीने पत्नी मोबाईलवर मित्राशी गप्पा मारत असून त्यांच्यात काहीतरी असल्याच्या संशयावरुन ती झोपेत असताना तिच्या चेहऱ्यावर उकळतं तेल टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

चारित्र्यावर संशय; 'त्याने' झोपलेल्या बायकोच्या चेहऱ्यावर टाकले उकळते तेल
नागपूर : चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नी झोपेत असताना तिच्या चेहऱ्यावर उकळतं तेल फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत पीडित महिला ३५ टक्के भाजली असून तिच्यावर मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दररोज कित्येक महिला घरगुती हिंसाचाराच्या घटनांना बळी पडतात. किरकोळ वाद, सासुरवास, चारित्र्यावर संशय अशा एक ना अनेक कारणांवरुन हिंसा केली जाते. नागपुरात एका पतीने पत्नी मोबाईलवर मित्राशी गप्पा मारत असून त्यांच्यात काहीतरी असल्याच्या संशयावरुन हे कृत्य केल्याचे कळते. ही घटना पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पंचशील नगरमध्ये घडली असून सतीश भिमटे असे आरोपीचे नाव आहे.
आरोपी सतीश हा पेंटींगचे काम करतो. त्याच्या घरी पत्नी भावना व दोन मुले आहेत. मागील चार महिन्यांपासून सतीश बेरोजगार आहे. तो घरीच असल्याने चिडचिड करायचा. गेल्या काही दिवसांपासून सतीश आणि भावनामध्ये मोबाइलवर बोलण्यावरुन वाद होत होते. भावना आपल्या मित्राबरोबर मोबाईलवर बोलत राहायची हे सतीशला सहन होत नव्हते. तो तिच्यावर संशय घेऊ लागला व यातून त्यांची भाडणं होऊ लागली. गेल्या काही दिवसांपासून सतीश रागातच होता.
दरम्यान, पत्नी पहाटे पाच वाजता झोपली असताना सतीशने तेल गरम केले आणि ते उकळलेले तेल तिच्या चेहऱ्यावर फेकले. अचानक झालेल्या या प्रकाराने भावना भांभावून उठली व जोरजोरात ओरडू विव्हळू लागली. या घटनेत भावनाचा चेहरा गंभीररित्या भाजला गेला, तिला उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले.
या घटनेप्रकरणी आरोपी सतीशविरोधात पाचपावली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.