मुलगी झाली नकोशी; पत्नी व लेकीला छळून 'त्याचा' घटस्फोटाविना दुसरीशी घरठाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2022 11:54 AM2022-07-08T11:54:57+5:302022-07-08T12:02:35+5:30

मुलगी झाली म्हणून अगोदर पाच वर्षे पत्नी व मुलीला छळणाऱ्या तसेच हुंड्याची मागणी करणाऱ्या पतीने चक्क घटस्फोट न घेताच दुसरे लग्न केल्याची बाब समोर आली आहे.

Husband tortured wife and daughter for five years after birth of girl child also demanded dowry and remarried without divorce | मुलगी झाली नकोशी; पत्नी व लेकीला छळून 'त्याचा' घटस्फोटाविना दुसरीशी घरठाव

मुलगी झाली नकोशी; पत्नी व लेकीला छळून 'त्याचा' घटस्फोटाविना दुसरीशी घरठाव

Next
ठळक मुद्देपत्नीचा मानसिक व शारीरिक छळ : नराधम पतीविरोधात गुन्हा दाखल

नागपूर : मुलगी ही घराची लक्ष्मी समजली जाते व आधुनिक विचारसरणीत मुलगा-मुलगी हा भेद अनेक पालक पाळतदेखील नाहीत. मात्र, बुरसटलेल्या विचारांतून मुलगी म्हणजे ओझे असे समजणारे काही महाभागदेखील आहेत. मुलगी झाली म्हणून अगोदर पाच वर्षे पत्नी व मुलीला छळणाऱ्या तसेच हुंड्याची मागणी करणाऱ्या पतीने चक्क घटस्फोट न घेताच दुसरे लग्न केल्याची बाब समोर आली आहे. पत्नीने यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली असून, कुणीतरी न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.

संबंधित महिलेचे २०१६ मध्ये बजरंग नगर येथील रोशन कुंजरकर याच्याशी लग्न झाले. सुरुवातीचे एक वर्ष चांगले गेले. मात्र, २०१७ मध्ये त्यांना मुलगी झाली व त्यानंतर पतीची वागणूक बदलली. रोशनने दारू पिणे सुरू केले व नशेत तो पत्नीला शिवीगाळ, मारहाण करायचा. मला मुलगी नको व तिला घेऊन तू घरून निघून जा, असे तो नेहमी म्हणायचा. मुलगी झाली असल्याने आता मला हुंडा पाहिजे. तू माहेरून पैसे आण, नाही तर धंदा करून पैसे कमव व तुझ्या मुलीला पोस, अशी भाषा तो वापरायचा. या त्रासाला कंटाळून संबंधित महिला अनेकदा माहेरी निघून गेली. मात्र, प्रत्येकवेळी रोशन माफी मागून महिलेला परत घेऊन यायचा; परंतु काही दिवसांनी परत तेच चित्र असायचे. २१ एप्रिल २०२० रोजी त्याने पत्नीला खूप मारहाण केली होती व तिने नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रारदेखील दिली होती.

७ फेब्रुवारी रोजी महिलेच्या दिराचे लग्न होते व एक दिवस अगोदर रोशन पत्नीच्या कामाच्या ठिकाणी गेला व आता माहेरी परत जायचे नाही, असे म्हणत त्याने चाकू काढून धमकी दिली. दरम्यान, १ जून रोजी त्याने दुसऱ्याच मुलीशी लग्न केल्याची बाब महिलेला समजली. त्यांच्या लग्नाचे फोटोदेखील तिला मिळाले. यानंतर तिने अजनी पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. पोलिसांनी रोशनविरोधात हुंडाबंदी अधिनियमासह एकूण पाच कलमांतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे.

घरच्यांनादेखील मारहाण

पत्नीला तो नेहमी मारहाण करत असल्याने रोशनची आजी व भाऊ मध्यस्थी करायचे. मात्र, त्यांच्यावरदेखील तो संतापायचा व मारायला धावायचा. २०२० मध्ये महिलेने तक्रार नोंदविली असताना त्याची पोलिसांनी गंभीर दखल घेतली नव्हती, त्यामुळे रोशनला कुणाचाही धाक नव्हता.

Web Title: Husband tortured wife and daughter for five years after birth of girl child also demanded dowry and remarried without divorce

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.