पत्नी सोडून जाईल, या भीतीने पतीने घेतले विष!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2022 11:42 AM2022-02-05T11:42:34+5:302022-02-05T11:50:24+5:30
पत्नी आपल्याला सोडून तर जाणार नाही ना, अशी भीती वाटायला लागल्याने पतीने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.
नागपूर : पत्नी सोडून जाईल, या भीतीने पतीने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना उमरेड पोलीस ठाण्याच्या आवारात शुक्रवारी (दि. ४) दुपारच्या सुमारास घडली. पाेलिसांच्या प्रसंगावधानामुळे त्याचे प्राण वाचले.
प्रदीप रघुवीर पटेल (३४, रा. हिवरीनगर, नागपूर) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पतीचे नाव आहे. प्रदीप मूळचा सागर (मध्य प्रदेश) येथील रहिवासी असून, ताे सध्या नागपूर शहरात वास्तव्याला आहे. शादी डाॅट काॅमच्या माध्यमातून ताे मंगळवारी पेठ, उमरेड येथील ३० वर्षीय विवाहित महिलेच्या संपर्कात आला. तिला दाेन मुली आहेत. त्यांच्या या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, कुटुंबीयांनी ती व तिच्या दाेन मुली बेपत्ता असल्याची तक्रार उमरेड पाेलीस ठाण्यात नाेंदविल्याने पाेलीस तिचा शाेध घेत हाेते. ती नागपूर शहरात वास्तव्याला असल्याचे कळताच पाेलिसांनी तिची भेट घेतली. त्यावेळी तिने आपण प्रदीपसाेबत लग्न केल्याची माहिती पाेलिसांना दिली. त्यामुळे पाेलिसांनी तिला पुरावा म्हणून विवाह प्रमाणपत्र पाेलीस ठाण्यात सादर करण्याची सूचना केली हाेती.
त्याअनुषंगाने प्रदीप व ती दाेन्ही मुलींना घेऊन शुक्रवारी दुपारी उमरेड पाेलीस ठाण्यात आली हाेती. ती पाेलीस ठाण्याच्या आवारात कुटुंबीयांशी बाेलत असताना ती कुटुंबीयांसाेबत जाणार तर नाही ना, अशी भीती वाटायला लागल्याने प्रदीप लगेच जवळच्या कृषी सेवा केंद्रात गेला. तिथून त्याने कीटकनाशक खरेदी केले व परत पाेलीस ठाण्याच्या आवारात आला. त्यानंतर त्याने सर्वांसमक्ष कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
पाेलिसांचे प्रसंगावधान
कीटकनाशक प्राशन करताच प्रदीप खाली काेसळला. ही बाब लक्षात येताच पाेलीस निरीक्षक प्रमोद घोंगे यांच्यासह राधेश्याम कांबळे, रूपेश महाजन, विष्णू जायेभाये, रवी जाधव, आशिष खराबे आदी पाेलीस कर्मचारी त्याच्या मदतीला धावले. पाेलिसांनी प्रदीपला लगेच स्थानिक खासगी हाॅस्पिटलमध्ये नेले. त्याची प्रकृती स्थिर व धोक्याबाहेर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
पतीचे कोरोनामुळे निधन
काेराेना संक्रमण काळात तिच्या पतीचे २०२० मध्ये काेराेनामुळे निधन झाले. त्यामुळे ती दाेन मुलींसाेबत उमरेड शहरातील मंगळवारी पेठ भागात राहायची. पुढे जुलै-ऑगस्ट २०२१ मध्ये ती शादी डॉट कॉमच्या माध्यमातून प्रदीप पटेलच्या संपर्कात आली आणि त्यांची आपसात ओळख झाली. त्यानंतर ती मुलींना घेऊन नागपूर शहरात राहायली गेली हाेती.