पत्नीवर गलिच्छ आरोप करणारा पती क्रूरच
By admin | Published: September 24, 2016 01:10 AM2016-09-24T01:10:23+5:302016-09-24T01:10:23+5:30
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन विविध प्रकारचे गलिच्छ आरोप करणारा व पत्नीला अमानुषपणे मारहाण करणारा पती क्रूरच ठरतो
हायकोर्टाचा निर्वाळा : घटस्फोट मंजूर करून दिलासा
नागपूर : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन विविध प्रकारचे गलिच्छ आरोप करणारा व पत्नीला अमानुषपणे मारहाण करणारा पती क्रूरच ठरतो असा निष्कर्ष मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात नोंदविला आहे.
विभा व अरुण असे प्रकरणातील दाम्पत्याचे नाव असून विभा अमरावती तर, अरुण वर्धा येथील रहिवासी आहे. अरुणच्या क्रूरतेच्या आधारावर घटस्फोट मिळण्यासाठी विभाने अमरावती कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली होती. कुटुंब न्यायालयाने ३० डिसेंबर २०१५ रोजी ही याचिका खारीज केली. या निर्णयाविरुद्ध विभाने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व इंदिरा जैन यांनी वरीलप्रमाणे निष्कर्ष नोंदवून विभाची याचिका मंजूर केली व कुटुंब न्यायालयाचा निर्णय रद्द करून विभाला अरुणच्या क्रूरतेच्या आधारावर घटस्फोट मंजूर केला. यामुळे विभाला मोठा दिलासा मिळाला.
या दाम्पत्याचे ११ मार्च २००० रोजी लग्न झाले होते. सासरच्या घरी सासरा, सासू, दीर, नणंद व विवाहित नणंदेची दोन मुले रहात होती. ते विभाला चांगली वागणूक देत नव्हते. विविध कारणांवरून विभाचा छळ करीत होते. विभा अभियंता असून अरुण इयत्ता १२ वी उत्तीर्ण आहे. उच्चशिक्षित असतानाही विभाला घरगुती कामे करायला लावण्यात येत होती. विभाने दोनदा गर्भपात झाल्यानंतर तिसऱ्यांदा मुलाला जन्म दिला. यानंतर तिने मुलाच्या शैक्षणिक भविष्यासाठी पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला. तिथे नोकरी करून स्थायिक होण्याचा तिचा विचार होता. तिने अरुणला समजावण्याचा प्रयत्न केला, पण तो मानला नाही. यामुळे विभा मुलाला घेऊन पुण्यात स्थायिक झाली. २०१० मध्ये तिने फ्लॅट खरेदी केला. यानंतर अरुण अचानक पुण्यात गेला. विभाने त्याला लॅपटॉप सर्व्हिस सेंटर टाकून दिले. परंतु, अरुणच्या दुर्लक्षामुळे व्यवसायात घाटा झाला. यामुळे अरुण घरीच राहून विभासोबत भांडण करीत होता. कंपनीत पदोन्नती मिळाल्यामुळे विभाला जास्तवेळ कार्यालयात थांबावे लागत होते. यावरून अरुण विभाच्या चारित्र्यावर संशय घेत होता. तिला गलिच्छ भाषेत शिविगाळ करीत होता. तिला मारहाण करीत होता. अरुणचा छळ असह्य झाल्यामुळे विभाने घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती.(प्रतिनिधी)