अनैतिक संबंधातून पतीचा खून
By admin | Published: October 20, 2016 03:20 AM2016-10-20T03:20:21+5:302016-10-20T03:20:21+5:30
मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माथनी शिवारात खून करून मृतदेह फेकून देण्यात आला होता.
तिघांना अटक : माथनीतील प्रकरणाचा उलगडा, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
नागपूर : मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माथनी शिवारात खून करून मृतदेह फेकून देण्यात आला होता. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा खून करणाऱ्या पत्नीसह अन्य दोन साथीदारांना अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक संजय पुरंदरे यांच्या नेतृत्वातील पथकाने बेवारस स्थितीत आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटवून आरोपींना अटक करण्याची कामगिरी अवघ्या १२ दिवसांत केली, हे विशेष!
मो. लालू ऊर्फ लाल मो. दुखामिया सैयद (४३, रा. बडकी छपरा, जि. बैसाली, ह.मु. हरीहरनगर, कन्हान) असे मृताचे नाव आहे. तो पत्नी गुड्डी ऊर्फ परवीनसोबत कन्हान येथे राहात होता. दरम्यान, ६ आॅक्टोबरला माथनी शिवारातील नाल्याजवळ कुजलेल्या, अॅसिडने चेहरा जाळलेल्या स्थितीत त्याचा मृतदेह आढळून आला. मात्र त्याची ओळख पटलेली नव्हती. घटनास्थळाची पाहणी आणि पंचनामा केल्यानंतर मौदा पोलिसांनी याप्रकरणी भादंविच्या कलम ३०२, २०१ अन्वये गुन्हा दाखल केला.
चेहरा जाळलेला आणि मृतदेह कुजलेल्या स्थितीत असल्याने प्रथम ओळख पटविणे पोलिसांसमोर आव्हान होते. मौदा पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असताना सदर गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा आणि कोणताही सुगावा लागत नसल्याने पोलीस अधीक्षक अनंत रोकडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला या प्रकरणाचा समांतर तपास करण्याचे आदेश दिले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन बारीकसारीक पुरावे गोळा करीत तपासाला गती दिली. मृताची ओळख पटविण्यासाठी केवळ अंगात असलेले कपडे तेवढा एक आधार होता. त्याआधारे स्थानिक गुन्हे शाखेने खबऱ्यांना‘अॅक्टिव्ह’ करीत ठिकठिकाणी शोधमोहीम राबविली.
त्यातच मंगळवारी (दि. १८) कन्हान येथील खबऱ्यांकडून लालू हा व्यक्ती गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असून बेपत्ता झाल्याची पोलीस ठाण्याला तक्रार न देता त्याची पत्नी ही दुसऱ्या व्यक्तीसोबत राहात असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला संशय आल्याने तिला तिच्या पतीबाबत विचारपूस केली. मात्र तिने उडवाउडवीची उत्तरे दिली.
परिणामी पोलिसांचा संशय बळावला. प्रियकराच्या मदतीने तिने काटा काढला असावा, असाही पोलिसांना संशय आला. त्यामुळे पोलिसांनी त्या दिशेने तपास केला. मृताच्या अंगावर आढळलेल्या कपड्यांचे छायाचित्र कन्हान येथील नागरिकांना दाखविताच मृत हा लालू असल्याचे स्पष्ट झाले. (जिल्हा प्रतिनिधी)
प्रियकराच्या मदतीने काढला काटा
कांद्री कन्हान येथे राहात असलेल्या लालूच्या पत्नीचे मो. तनबिर मो. रफिक पिंजारी (३०, रा. बिरडावन टोला, ता. पनापूर, जि. मुजफ्फरपूर) याच्यासोबत प्रेमसंबंध जुळले. त्यातूनच अनैतिक संबंधाच्या आड येणाऱ्या लालूचा ‘गेम’ करण्याची योजना आरोपींनी आखली. यानुसार मृताची पत्नी, तिचा प्रियकर मो. तनबिर मो. रफिक पिंजारी आणि तनबिरचा मित्र मो. तोहीद मो. मसीर मान्सुरी (३२, रा. मुस्लिम टोला, जि. बैसाली, बिहार) यांनी ३ आॅक्टोबर रोजी लालूचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून चेहऱ्यावर अॅसिड टाकून चेहरा विद्रुप करून मृतदेह मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माथनी शिवारात फेकून पळ काढला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बारीक-सारीक बाबी तपासत गुन्ह्याचा पर्दाफाश केला. याप्रकरणी तिन्ही आरोपींना अटक करून मौदा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कामगिरी पोलीस अधीक्षक अनंत रोकडे, अप्पर पोलीस अधीक्षक नरसिंग शेरखाने यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पुरंदरे, सहायक पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर, सहायक पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी, पोलीस हवालदार शैलेश शुक्ला, नायक पोलीस शिपाई मंगेश डांगे, पोलीस शिपाई प्रणय बनाफर, विशाल चव्हाण, चालक सहायक फौजदार साहेबराव बहाडे, महिला पोलीस शिपाई दुर्गा कागदे मेश्राम, नम्रता बघेल, कीर्ती हरडे यांनी पार पाडली. त्यांना जिल्ह्यातील पथकातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.