प्रियकराच्या मदतीने केला पतीचा खून : तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 08:35 PM2020-08-07T20:35:58+5:302020-08-07T20:37:16+5:30
पत्नीने तिच्या प्रियकर व त्याच्या चुलत भावाच्या मदतीने अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा उशीने नाक तोंड दाबून खून केला. ही घटना गुरुवारी मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास घडली असून, पोलिसांनी आरोपी पत्नीसह अन्य दोघांना अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (कामठी) : पत्नीने तिच्या प्रियकर व त्याच्या चुलत भावाच्या मदतीने अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा उशीने नाक तोंड दाबून खून केला. ही घटना गुरुवारी मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास घडली असून, पोलिसांनी आरोपी पत्नीसह अन्य दोघांना अटक केली.
राजू हरिदास कोकुर्डे (३५) असे मृताचे नाव असून, अटकेतील आरोपींमध्ये त्याच्या पत्नीसह रुपेश दिलीप बिराह (३५) व त्याचा चुलत भाऊ हरिश्चंद्र राजेंद्र बिराह (३४) या तिघांचा समावेश आहे. राजू हा मूळचा बरबडी (ता., जिल्हा वर्धा) येथील रहिवासी असून, तो स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात परिचारकपदी नोकरीला असल्याने क्वॉर्टरमध्ये राहायचा. त्याच्या पत्नीचे शेजारी राहणाऱ्या रुपेश बिराहसोबत प्रेमसंबंध व नंतर अनैतिक जुळले. याबाबत कळताच राजू शहरातील रमानगरात किरायाने घर घेऊन राहू लागला.
राजूची पत्नी व रुपेशच्या भेटी सुरूच होत्या. त्यामुळे त्याने पत्नीला अनेकदा समजावून सांगितले होते. त्यातच रुपेश घरी येत असल्याने गुरुवारी (दि. ६) रात्री पतीपत्नीचे जोरात भांडणही झाले होते. त्यावेळी रुपेश तिथेच होता. त्याचवेळी रुपेशने राजूला कायम संपविण्याची योजना आखली.
तो मध्यरात्री २.१५ वाजताच्या सुमारास हरिश्चंद्रला सोबत घेऊन राजूच्या घरी आला. त्यावेळी राजू, त्याची पत्नी व मुलगा झोपेत होते. राजूच्या पत्नीने दोघांनाही घरात घेतले. त्यांनी दोरीने राजूचे हात बांधले आणि त्याचे नाक व तोंड उशीने जोरात दाबले. श्वास गुदमरल्याने राजूचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तिन्ही आरोपींना अटक केली. शिवाय, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी कामठी (नवीन) पोलिसांनी भादंवि ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला असून, तपास सहायक पोलीस निरीक्षक सुरेश कन्नाके करीत आहेत.
मुलगा रडला आणि बिंग फुटले
या प्रकारामुळे राजूच्या पाच वर्षीय मुलाला जाग आली. हा सर्व प्रकार बघून त्याने जोरात रडायला सुरुवात केली. रडण्याच्या आवाजामुळे शेजाऱ्याने औत्सुक्यापोटी खिडकीतून त्यांच्या घरात डोकावून बघितले. हा सर्व प्रकार लक्षात येताच त्याने पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठले. त्यावेळी राजूची पत्नी, रुपेश व हरिश्चंद्र घरीच होते. त्यामुळे पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेत अटक केली. त्यांच्याकडून दोरी, चाकू व उशी जप्त केली. या घटनेमुळे राजूचा मुलगा मात्र अनाथ झाला.