‘त्या’ पतीची याचिका फेटाळली
By admin | Published: February 26, 2017 03:05 AM2017-02-26T03:05:07+5:302017-02-26T03:05:07+5:30
पत्नीच्या गर्भातील बाळ आपले नसून, ती आपल्याशी क्रूरपणाने वागते, मनमानी करते, घरी स्वयंपाक न करता,
हायकोर्टाचा निकाल : पत्नीच्या गर्भातील बाळावर पतीचा संशय
नागपूर : पत्नीच्या गर्भातील बाळ आपले नसून, ती आपल्याशी क्रूरपणाने वागते, मनमानी करते, घरी स्वयंपाक न करता, दररोज हॉटेलमधील जेवणाचा हट्ट धरते, अशा आरोपांसह पतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आपल्या पत्नीविरूद्ध दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
या प्रकरणाची हकीकत अशी की, गोंदिया येथील नरेश आणि उपराजधानीतील सुनिता (दोन्ही नावे बदललेली) यांचा १७ वर्षांपूर्वी म्हणजे, ११ जून १९९९ रोजी विवाह झाला होता. यानंतर काही दिवसांत सुनिता ही गर्भवती झाली. मात्र नरेश याने पत्नीच्या पोटातील बाळ आपले नसल्याचा आरोप करून तिला गर्भपात करण्यास सांगितले. मात्र सुनिताने गर्भपात करण्यास नकार देत, ८ सप्टेंबर १९९९ रोजी पतीचे घर सोडले. त्यावर नरेशने तिला कायदेशीर नोटीस पाठविली. शिवाय कौटुंबिक न्यायालयात अर्ज सादर केला. पतीच्या मते, त्याची पत्नी ही घरी स्वयंपाक करीत नाही. त्याला दररोज हॉटेलमध्ये घेऊन जाण्यासाठी आग्रह धरते. ती त्याचे ऐकत नाही, शिवाय त्याच्याशी क्रूरपणाने वागते. असा त्याने आरोप केला होता. त्याचवेळी पत्नीने त्याच्यावर माहेरून हुंडा आणण्यासाठी छळ करीत असल्याचा आरोप करीत, त्याच्यासोबत संसार करू शकत नसल्याचे सांगितले होते. त्यावर कौटुंबिक न्यायालयाने नरेशचा अर्ज फेटाळून लावला होता. त्यावर नरेशने हायकोर्टात धाव घेउन ही याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने दोन्ही पक्षाची बाजू ऐकून सुनिताकडे पतीचे घर सोडून जाण्यासाठी पुरेसे कारण असल्याचा निर्वाळा देत, कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय कायम ठेवून पतीची याचिका फेटाळून लावली. (प्रतिनिधी)