झोपडीतून फ्लॅटमध्ये, पण रस्ताच नाही!

By admin | Published: September 15, 2016 02:38 AM2016-09-15T02:38:33+5:302016-09-15T02:38:33+5:30

उपराजधानीला ‘झोपडपट्टीमुक्त शहर’ करण्याच्या हेतूने केंद्र सरकारच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण

In the hut flats, but not the road! | झोपडीतून फ्लॅटमध्ये, पण रस्ताच नाही!

झोपडीतून फ्लॅटमध्ये, पण रस्ताच नाही!

Next

व्यथा कायम : एसआरएच्या योजनेत पाणी व वीज नाही
नागपूर : उपराजधानीला ‘झोपडपट्टीमुक्त शहर’ करण्याच्या हेतूने केंद्र सरकारच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) योजनेंतर्गत महानगरपालिका शहरातील झोपडपट्टीधारकांना मोफत गाळे (फ्लॅट) देण्याची योजना राबवित आहे. यातूनच नारी येथील सम्राट अशोक नगर येथे १६० गाळ्यांचे बांधकाम करण्यात आले आहे. परंतु येथे रस्ता, पाणी, वीज, सिवेज लाईन अशा स्वरूपाच्या मूलभूत सुविधा नाही. त्यामुळे गाळ्यापेक्षा झोपडपट्टी चांगली होती. असे म्हणण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. येथून अवघ्या ५०० मीटर अंतरावर नागरी सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे शहर व ग्रामीण भागाच्या विकासाचे स्वप्न दाखविणारे नागपूर सुधार प्रन्यास महानगर नियोजन क्षेत्राचा विकास कसा करणार असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
१६० गाळ्यांची योजना झिरो माईलपासून ७.८५ किलोमीटर तर आॅटोमोटिव्ह चौकापासून अवघ्या १.६ किलोमीटर अंतरावर आहे. असे असतानाही कामठी मार्गालतचा हा परिसर विकासापासून दूर आहे. याला नागपूर सुधार प्रन्यास जबाबदार आहे. २००१ च्या शहर विकास आराखड्यात कामठी मार्गावरील स्टार मोटर्स जवळचा ८० फुटांचा डीपीरोड मंजूर आहेत. परंतु १५ वर्षानंतरही येथील रस्त्याचे काम करण्यात आलेले नाही. काही वर्षापूर्वी खडीकरण करण्यात आले होते. परंतु आता हा रस्ता वाहतुकीयोग्य राहिलेला नाही. चांगला रस्ता नसल्याने या भागातील विकास थांबला आहे. १६० गाळ्यांच्या बाजूलाच पुन्हा १०० गाळ्यांचे बांधकाम सुरू आहे. या गाळेधारकांनाही अशाच समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. गाळ्यांचे बांधकाम करताना रस्त्यांचा विचारच करण्यात आलेला नाही. आजूबाजूच्या मोकळ्या प्लाटमधून येथील नागरिक ये-जा करतात. परंतु प्लॉटधारकांनी जागेला संरक्षण भिंत उभारल्यानंतर गाळेधारकांना रस्ताच राहणार नाही.

सर्वत्र असते अंधाराचे साम्राज्य
नागपूर : चांगला रस्ता नसल्याने विजेचे खांब उभारण्यात आलेले नाही. त्यामुळे या परिसरातून जाणाऱ्या वीज वाहिनीवरून येथील गाळेधारकांनी अवैध वीज जोडणी केली आहे.
पाणीपुरवठा व सिवेज लाईन येथील नागरिकांच्या नशिबीच नसल्याचे चित्र आहे.
या परिसरात पथदिवे नसल्याने रात्रीच्या सुमारास सर्वत्र अंधाराचे साम्राज्य असते.
पावसाळ्याच्या दिवसात या भागातील परिस्थिती दुर्गम भागासारखीच असते. यालाच झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन म्हणणार का, असा प्रश्न झोपडपट्टीधारकांना पडला आहे. (प्रतिनिधी)

मनपा-नासुप्र यांच्यात वाद
नारी येथील एसआरए योजनेसाठी महानगरपालिके ने जागा उपलब्ध केली. परंतु येथील नागरिकांना रस्ते, पाणी व वीज उपलब्ध करण्याची जबाबदारी नासुप्रची आहे. या संदर्भात महानगरपालिकेने नासुप्रला वेळोवेळी पत्र पाठविले. बैठकाही घेण्यात आल्या. परंतु रस्त्याचा प्रशन सुटला नाही. नासुप्रतील अधिकाऱ्यांच्या उदासीन भूमिकेमुळे रस्त्याचे काम रखडले आहे. चांगल्या रस्त्यासाठी ६० लाखांची गरज आहे. परंतु महानगरपालिका व नासुप्र यांच्या वादात हे काम रखडले आहे. त्यामुळे नागरिकांना कोणत्याही स्वरूपाच्या मूलभूत सुव्धिा उपलब्ध नाही.
पिण्यासाठी बोअरवेलचे पाणी
महानगरपालिकेने एसआरए योजनेतून २६० गाळे उभारलेले आहेत. परंतु येथील नागरिकांना नळाव्दारे पाणीपुरवठा केला जात नाही. अधूनमधून टँकर येतो. त्यामुळे नागरिकांना पिण्यासाठी बोअरवेलच्या पाण्याचा वापर करावा. लागतो. यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
विजेचा प्रश्न केव्हा सुटणार
निवासी संकुल वा गाळे उभारताना रस्ता व पाण्यासोबतच वीज पुरवठा होणे आवश्यक आहे. परंतु येथील नागरिकांना वीज पुरवठा करण्यासाठी डीपी उभारण्यात आलेली नाही. वेळोवेळी मागणी करूनही ही समस्या सुटत नसल्याने नागरिकांना नाईलाजाने वीजचोरी करावी लागते. वीज पुरवठ्यासंदर्भात महानगरपालिकेने स्पॅन्को कंपनीला वेळोवेळी पत्रे दिली. परंतु अद्याप हा प्रश्न सुटलेला नाही.


शेतकऱ्यांना मोबदला कधी मिळणार
नारी भागात एसआरए व इतर प्रकल्पाच्या ठिकाणी जाण्यासाठी रस्त्यांची गरज आहे. यासाठी जमीन अधिग्रहीत करावी लागणार आहे. परंतु उप्पलवाडी येथे ८० फुटांचा रस्ता आरक्षित आहे. या रस्त्याचे खडीकरणही करण्यात आले आहे. परंतु शेतकऱ्यांना अद्याप जमिनीचा मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे आधी मोबदला नंतर काम अशी भूमिका येथील शेतकऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे मोबदला कधी मिळणार, असा प्रश्न आहे.
उप्पलवाडी येथे ५५० गाळ्यांची योजना
उप्पलवाडी येथे एसआरए योजनेंतर्गत खासगी सहभागातून ५५० गाळे उभारण्याचा प्रकल्प राबविला जात आहे. परंतु येथे जाण्यासाठी रस्ताही नाही. निवासी गाळ्यांचे बांधकाम करतानाच रस्ते, वीज, पाणी व सिवेज लाईन अशा सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे.
रस्त्यांमुळे विकास रखडला
कोणत्याही भागाच्या विकासासाठी चांगल्या रस्त्यांची गरज असते. नारी व उप्पलवाडी परिसर शहरालगतच आहे. या परिसरात शासकीय तसेच खासगी प्रकल्प प्रस्तावित आहेत. परंतु रस्ते नसल्याने या भागाचा विकास रखडला आहे.
कमी किमतीत घरासाठी उत्तम जागा
कामठी मार्गालगतच्या भागात कमी किमतीत घरकुलाची योजना शक्य आहे. शहराच्या हद्दीत हा परिसर येतो. तसेच या भागात जागाही उपलब्ध आहे. मूलभूत सुविधा उपलब्ध झाल्यास कमी किमतीत घरे शक्य आहे. नासुप्रसाठी ही जागा चांगला पर्याय होऊ शकते. या परिसरालगतच शैक्षणिक संस्था, बाजारपेठ, औद्योगिक वसाहती आहेत. या भागाचा विकास आराखडा तयार करून रस्ते, पाण्याची लाईन, सिवेज लाईनच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. परंतु यासाठी आवश्यक असलेली जमीन अधिग्रहित करण्यात आली नाही.

Web Title: In the hut flats, but not the road!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.