‘हायब्रिड एरोबोट’ प्रकल्प नागपुरात; गडकरींची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2018 03:45 AM2018-11-03T03:45:04+5:302018-11-03T07:10:33+5:30
देशभरातील प्रमुख जलमार्गांत जल, जमीन व हवेत चालणारी ‘हायब्रिड एरोबोट’ चालविण्यात येणार आहे.
नागपूर : देशांतर्गत जलवाहतुकीला चालना देण्यासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात एक नवे पाऊल टाकण्यात येत आहे. देशभरातील प्रमुख जलमार्गांत जल, जमीन व हवेत चालणारी ‘हायब्रिड एरोबोट’ चालविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, याचा उत्पादन प्रकल्प रशियातील एका कंपनीच्या सहकार्याने नागपूर जिल्ह्यातील कोराडी येथे सुरू करण्यात येणार आहे.
गडकरी यांनीच यासंदर्भात शुक्रवारी सविस्तर माहिती दिली. यावेळी राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, रशियातील ‘स्कोल्कोव्हो एरोस्पेस क्लस्टर’चे मुख्य समन्वयक सुक्रित शरन उपस्थित होते. भारतातील अंतर्गत जलमार्गांमध्ये अनेकदा दलदलयुक्त प्रदेश, बर्फाळ क्षेत्र यांचा अडथळा येतो. मात्र या अडथळ्यांवर मात करणाऱ्या ‘हायब्रिड एरोबोट’ रशियात तयार करण्यात आल्या आहेत. या बोटी अवघे १० सेमी पाणी असलेल्या चिखलयुक्त प्रदेशातून चालू शकतात. सोबतच बर्फातदेखील यांचा उपयोग होऊ शकतो. पेट्रोल, विद्युत यांच्यासोबतच ‘मिथॅनोल’वरदेखील या बोटी चालू शकतात. सर्वसाधारण बोटींपेक्षा यांचा वेग तीन पटीने जास्त असून ८५ किमी प्रति तास या वेगाने त्या पाण्यात सहज चालू शकतात. या बोटींची प्रवासी क्षमता ही ११ ते ६० प्रवाशांपर्यंत आहे, अशी माहिती गडकरींनी दिली.
विदर्भाला वरदान
‘हायब्रिड एरोबोट’संदर्भात ‘लोकमत’ने सर्वात अगोदर वृत्त प्रकाशित केले होते. कोराडीत हा प्रकल्प येत्या चार महिन्यात उभा राहिल. यामुळे विदर्भात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार आहे.