उपराजधानीतील हायप्रोफाईल महिला चोर पोलिसांच्या जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 01:21 PM2020-01-18T13:21:45+5:302020-01-18T13:22:51+5:30
पारशिवनीत राहणारी पिंकी उच्चशिक्षित आहे. तिने एमएड केले आहे. ती फर्राटेदार इंग्रजी बोलते. तिचे उच्चभ्रू महिलेसारखे राहणीमान पाहून ती चोरटी आहे, असा कुणी संशयही घेऊ शकत नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सराफा बाजार आणि गर्दीच्या ठिकाणी फिरून संधी मिळताच महिलांच्या पर्समधील दागिने, रोकड लंपास करणाऱ्या एका हायप्रोफाईल चोरट्या महिलेला तहसील पोलिसांनी अटक केली. पौर्णिमा ऊर्फ पिंकी वासुदेव कामडे (वय २५) असे तिचे नाव आहे.
पारशिवनीत राहणारी पिंकी उच्चशिक्षित आहे. तिने एमएड केले आहे. ती फर्राटेदार इंग्रजी बोलते. तिचे उच्चभ्रू महिलेसारखे राहणीमान पाहून ती चोरटी आहे, असा कुणी संशयही घेऊ शकत नाही. मात्र, उच्चशिक्षित पिंकीने नोकरी अथवा रोजगाराची वाट न धरता हातसफाई सुरू केली. पिंकी अगदी चालता चालताच पर्समधून बेमालूमपणे दागिने, रोकड लंपास करते. ११ जानेवारीला दुपारी इतवारी सराफा बाजारात झिंगाबाई टाकळीतील अमन इंगोले हे त्यांची आई सुनंदा यांच्यासोबत आले. त्यांनी सोन्याची साखळी आणि पदक विकत घेतले आणि पायी रस्त्याने निघाले. पिंकीने मोठ्या सफाईने सुनंदा यांच्या पर्समधील दागिन्याची पर्स लंपास केली होती.
अमन इंगोलेंच्या तक्रारीवरून तहसील पोलिसांनी गुन्हा दाखल केला. १४ जानेवारीला पुन्हा पिंकीने अशीच एक चोरी केली मात्र पळून जाताना नागरिकांनी पिंकीला पकडले. तिच्या पर्समध्ये चोरीचे दागिने आढळले. त्यानंतर पोलिसांनी पिंकीला अटक करून तिच्या पारशिवनीतील घरी धडक दिली. तिच्या घरझडतीत घबाडच हाती लागल्याने पोलीसही चक्रावले. चक्क ६०९ ग्राम सोन्याचे दागिने, रोख, मोबाईल, हातघड्याळ असा एकूण २१ लाख, १५१२ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. तिने गुरुवारपर्यंतच्या चौकशीत एकूण १४ गुन्ह्यांची कबुली दिली. त्यात तहसील ठाण्यातील ८, सीताबर्डीतील ५ आणि रामटेकमधील एक गुन्हा आहे.
सीताबर्डी पोलिसांकडून तपास
झटक्यात हजारो रुपये हाती पडत असल्याने चोरी करण्याचे व्यसनच पिंकीला जडले होते. ती पॉश कपडे घालून पारशिवनीहून नागपुरात यायची. कधी सीताबर्डी तर कधी इतवारी परिसरातील सराफा बाजारात फिरायची आणि हात मारल्यानंतर गावाला परत जायची. तहसील पोलिसांकडून पिंकीचा पीसीआर संपल्यानंतर तिला आता सीताबर्डी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.