जे वाट्याला आलं, ते जीव ओतून साकारलं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 10:09 AM2018-02-05T10:09:18+5:302018-02-05T10:13:26+5:30
‘भूमिका महत्त्वाची नाही, तर तुम्ही ती किती ताकदीने साकारता ते महत्त्वाचे आहे’, ही भावना व्यक्त करताना अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी बोलत्या झाल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रिचर्ड अॅटेनबरो यांच्या ‘गांधी’ चित्रपटात कस्तुरबा गांधी यांची भूमिका साकारल्यानंतर आंतरराष्ट्रीय ओळख प्राप्त झाली. याच भूमिकेसाठी आंतरराष्ट्रीय बाफ्टा पुरस्कार प्राप्त करणाºया त्या एकमेव भारतीय कलावंत आहेत. पण वयाच्या २७ व्या वर्षी ही भूमिका साकारल्यानंतर वृद्ध कलावंताचा शिक्का लागला. पुढे याच प्रकारच्या भूमिका आॅफर होऊ लागल्या. धर्मेंद्र, मिथूनपासून अमिताभ बच्चन यांच्या आईच्या भूमिका येत गेल्या व त्या जीव ओतून साकारत गेल्या. ‘भूमिका महत्त्वाची नाही, तर तुम्ही ती किती ताकदीने साकारता ते महत्त्वाचे आहे’, ही भावना व्यक्त करताना अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी बोलत्या झाल्या.
‘गांधी’ची कस्तुरबा असो, महेश भट्ट यांच्या ‘सारांश’मधील पार्वती असो की ‘अग्निपथ’मधील अमिताभची आई असो, व्यावसायिक, समानांतर सिनेमा, नाटक अशा प्रत्येक क्षेत्रात आपल्या जिवंत व दमदार अभिनयाने रोहिणी हट्टंगडी यांनी रसिकांच्या मनात कायम स्थान निर्माण केले आहे. आॅरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने अजेय गंपावार यांनी त्यांना बोलते केले, तेव्हा त्यांनी आपला कलापट प्रेक्षकांसमोर मांडला. ही महोत्सवाची समारोपीय मुलाखत होती. चित्रपटापेक्षा नाटकांची आवड असलेल्या रोहिणी यांनी जयदेव हट्टंगडी यांच्या दिग्दर्शनात ‘अविष्कार’ हे नाटक केले. यातील ‘चांगुणा’च्या भूमिकेसाठी त्यांना महाराष्ट स्टेट ड्रामा फेस्टिव्हलमध्ये पुरस्कृत करण्यात आले. अॅटेनबरो यांच्या ‘गांधी’साठी भक्ती बर्वे व स्मिता पाटील यांच्यामधून कस्तुरबासाठी त्यांची निवड झाली. गोविंद निहलानी यांच्या ‘पार्टी’ या समानांतर चित्रपटातील भूमिकेसाठी सहअभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार त्यांनी प्राप्त केला.
जपानचा ‘काबुकी’ हा एकपात्री प्रयोग साकारणाऱ्या त्या एकमेव भारतीय तर कन्नडच्या ‘यक्षगान’ हा प्रयोग साकारणाऱ्या त्या एकमेव महिला कलावंत आहेत. येत्या काळात ‘आजीची पोतळी’ ही वेबसिरीज व शेफ विष्णू मनोहर यांच्या ‘वन्स मोअर’मधील पुरुष भूमिकेबाबत त्यांनी माहिती दिली.
रोहिणी हट्टंगडी यांच्या मुलाखतीनंतर चीनच्या ‘फ्री अॅन्ड इजी’ या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप झाला. तत्पूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत महोत्सवाचा समारोप सोहळा पार पडला. यावेळी ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, सहायक आयुक्त रवींद्र देवतळे यांच्यासह आयोजनातील आॅरेंज सिटी कल्चरल फाऊंडेशनचे आयोजक सचिव डॉ. चंद्रशेखर मेश्राम, डॉ. संजय उगेमुगे, सप्तकचे डॉ. उदय गुप्ते, विलास मानेकर, उदय पाटणकर, नितीन सहस्रबुद्धे, प्रदीप मुन्शी, विकास लिमये, रवींद्र डोंगरे, अजेय गंपावार, प्रमोद कळमकर, मिलिंद मराठे आदी उपस्थित होते.
महोत्सवात ३१ चित्रपट सादर
महोत्सवात ३१ चित्रपट सादर करण्यात आले. यामध्ये ७ मराठी व हिंदीसह इतर भाषिक चित्रपटांचा समावेश होता. याशिवाय २९ शॉर्ट फिल्म्सही प्रदर्शित करण्यात आल्याचे डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी सांगितले.
फाऊंटेनच्या विकासात ‘टेंडर’ आडवे येते : गडकरी
तेलंगखेडी येथे आंतरराष्ट्रीय संकल्पनेतील म्युझिकल फाऊंटेन साकारण्याची योजना आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री रेवती यावर काम करीत असून त्याचे साहित्य विदेशातून येणार आहे. मात्र सरकारी धोरणानुसार ‘टेंडर’ काढण्याची सूचना वारंवार केली जाते. त्यामुळे हा प्रकल्प रखडत असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले. मात्र हा प्रकल्प पूर्ण करूच असा विश्वास त्यांनी दिला. नागपूर व विदर्भ साहित्य, कला, संस्कृतीच्या क्षेत्रात कमी पडतोय ही खंत त्यांनी व्यक्त केली. चित्रपटांचे चित्रीकरण विदर्भात व्हावे, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव व्हावे, चित्रपट व कला, संस्कृतीला चालना मिळावी ही भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.