कामगार रुग्णालयाच्या उणिवेला मी जबाबदार : आयुक्तांनी दिली कबुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 09:37 PM2019-01-07T21:37:52+5:302019-01-07T21:39:07+5:30
नागपूरच्या राज्य कामगार विमा योजना रुग्णालयात औषधांचा तुटवडा, यंत्रसामुग्रीचा अभाव व रिक्त पदांमुळे रुग्णसेवा अडचणीत आली आहे. याला मी म्हणजे, राज्य कामगार विमा योजना आयुक्त जबाबदार आहेत. वेळीच पदे, यंत्रसामुग्री व औषधांच्या तुटवड्याची समस्या सोडविली असती तर ही वेळ आली नसती. परंतु आता पुढील चार महिन्यात या सर्व समस्या मार्गी लागतील, अशी कबुली राज्य कामगार विमा योजना आयुक्त ए.बी. धुळाज यांनी दिली. राज्यातील कामगार विमा योजना रुग्णालयाचे निरीक्षण व आढावा घेण्यासाठी नागपुरात आले असताना ते ‘लोकमत’शी बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरच्या राज्य कामगार विमा योजना रुग्णालयात औषधांचा तुटवडा, यंत्रसामुग्रीचा अभाव व रिक्त पदांमुळे रुग्णसेवा अडचणीत आली आहे. याला मी म्हणजे, राज्य कामगार विमा योजना आयुक्त जबाबदार आहेत. वेळीच पदे, यंत्रसामुग्री व औषधांच्या तुटवड्याची समस्या सोडविली असती तर ही वेळ आली नसती. परंतु आता पुढील चार महिन्यात या सर्व समस्या मार्गी लागतील, अशी कबुली राज्य कामगार विमा योजना आयुक्त ए.बी. धुळाज यांनी दिली.
राज्यातील कामगार विमा योजना रुग्णालयाचे निरीक्षण व आढावा घेण्यासाठी नागपुरात आले असताना ते ‘लोकमत’शी बोलत होते.
आयुक्त धुळाज यांनी सोमवारी दुपारी १२ वाजता रुग्णालयात येताच बाह्यरुग्ण विभागाची पाहणी केली. तेथून ते आकस्मिक विभाग, क्ष-किरण विभाग, पॅथालॉजी विभाग, वॉर्ड, शस्त्रक्रिया गृह, औषधालय व औषध भंडाराची पाहणी केली. यावेळी त्यांनी रुग्णांच्या समस्याही जाणून घेतल्या. उपस्थित डॉक्टरांशी, अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना येणाºया अडचणी व त्या कशा सोडविता येईल यावरही चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. मीना देशमुख यांच्यासह सर्व वरिष्ठ डॉक्टर व अधिकारी उपस्थित होते.
‘मेघा भरती’द्वारे रिक्तपदे भरणार
आयुक्त धुळाज म्हणाले, रुग्णालयात ३३२ पैकी १०५ पदे रिक्त आहेत. यातील बहुसंख्य पदे ही ‘मेघा भरती’द्वारे भरण्याचा प्रयत्न राहील. नवी पदनिर्मिती करून त्याही भरण्याचा प्रयत्न आहे. विशेषत: रुग्णालयातील ‘एमडी मेडिसीन’ हे पद पुढील काही महिन्यात रिक्त होत आहे. ती जागाही भरली जाईल. आता डॉक्टरांअभावी वॉर्ड बंद होणार नाही, याची काळजी घेतली जाईल.
औषधांमध्ये गोंधळ झाला आहे
कामागार रुग्णालयात औषधांच्या तुटवड्यामुळे गोंधळ उडाला असल्याचे मान्य करीत, आयुक्त धुळाज म्हणाले, औषधांसाठी तीन कोटी रुपयांची मागणी केली असताना केवळ १.५३ कोटी रुपये मिळाले. आता पुन्हा औषधांचा ‘बजेट’चा प्रस्ताव तयार केला आहे. त्याला मंजुरी मिळून हा गोंधळ दूर होईल, असेही धुळाज म्हणाले.
तीन महिन्यात औषधे, दोन महिन्यात उपकरणांची खरेदी
औषधांच्या तुटवड्याविषयी माहिती देताना धुळाज म्हणाले, रुग्णालयातील औषधांचा तुटवडा दूर करण्यासाठी केंद्राकडून औषधे मागविली आहे. यामुळे पुढील तीन महिन्यात ती उपलब्ध होतील. सोनोग्राफीसारख्या आवश्यक यंत्रसामुग्रीची खरेदी पुढील दोन महिन्यात केंद्राकडून होईल. रुग्णालयाने पाठविलेल्या साधारण १५ यंत्राच्या खरेदी प्रस्तावाला परवानगी देण्यात येईल.
सोसायटीमधून औषधे व यंत्रसामुग्रीची खरेदी
राज्य शासनाने कामगार विमा महामंडळाची स्थापना रद्द करून त्याऐवजी राज्य कामगार विमा सोसायटीची स्थापना करण्यात आली आहे. महामंडळाकडून येणारी रक्कम थेट सोसायटीत जमा होणार आहे. यामुळे लवकरच औषधे व यंत्रसामुग्री खरेदी केली जाईल, अशी माहितीही आयुक्त धुळाज यांनी दिली.