मी ठाणेदार शारदा झांबरे...
By admin | Published: March 9, 2016 03:16 AM2016-03-09T03:16:56+5:302016-03-09T03:16:56+5:30
जय हिंद ... अंबाझरी पोलीस स्टेशन... मी पोलीस उपनिरीक्षक शारदा झांबरे बोलते... कोण बोलता..., हं... कुठे... अच्छा...थांबा... येतेच मी !
उपराजधानीत महिला पोलीस अधिकाऱ्यांचा अंमल : गुन्हेगारीवर नजर
नागपूर : जय हिंद ... अंबाझरी पोलीस स्टेशन... मी पोलीस उपनिरीक्षक शारदा झांबरे बोलते... कोण बोलता..., हं... कुठे... अच्छा...थांबा... येतेच मी ! फोन ठेवताच, चला हो... काढा गाडी ... तिकडे काही तरी गडबड आहे...! पोलिसांचे वाहन निघते. घटनास्थळी पोहचते. संबंधितांना विचारपूस होते. त्यांना तसेच त्यांच्या माहितीवरून आरोपींना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले जाते. प्राथमिक चौकशी केल्यानंतर थोडी ठोकपीट होते. नंतर गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली जाते. उपराजधानीतील २४ ही पोलीस ठाण्यात आज असेच मिळतेजुळते चित्र होते.
अंबाझरी ठाणे : शारदा झांबरे
दैनंदिन तक्रारी हातावेगळ्या करतानाच त्यांनी महिला दिनाच्या कार्यक्रमाची आज सुरक्ष व्यवस्था सांभाळली. पोलीस ठाण्यात आलेल्यांना योग्य सल्ला देत त्यांनी गोकुळपेठेत पोलीस मित्रांच्या बैठकीतही सहभाग नोंदवला. या शिवाय ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या भागात आयोजित कार्यक्रमातही त्या सहभागी झाल्या होत्या.
आत्मविश्वासात वाढ
पोलीस ठाणे म्हटले की, गडबड गोंधळ, ठोक-पीट, टाळाटाळ, शिवीगाळ अन् आरडाओरड असे गरमागरम वातावरण असते. मात्र, आज शहरातील २४ ही ठाण्यातील वातावरणात थोडीशी अदब बघायला मिळत होती. धावपळ होतीच. थोडीफार आरडाओरड असली तरी टाळाटाळ दिसत नव्हती. शिवीगाळही कमीच ऐकू येत होती. विशेषत: महिला अधिकारी कर्मचाऱ्यांचा उत्साह दुणावल्यासारखा जाणवत होता. आपल्याकडे विशेष जबाबदारी असल्याच्या जाणिवेमुळे त्यांच्यातील आत्मविश्वासही वाढल्याचे जाणवत होते.
पोलीस ठाणे निहाय पदभार असा
सोनेगाव - दीपाली राऊत, सीताबर्डी - विशाखा वाघाडे, धंतोली - नम्रता जाधव, अंबाझरी - शारदा झांबरे, प्रतापनगर पी. डी. गोदमले, एमआयडीसी - रामटेके, अजनी - संध्या चव्हाण, लकडगंज - वानखेडे, नंदनवन - प्रीती कुळमेथे, कोतवाली - हवालदार संगीता यादव, सदर - सारिका बागडे, मानकापूर - श्रीखंडे, जरीपटका - सोनवणे, तहसील - वृशाली वडस्कर, गणेशपेठ सुलभा राऊत, यशोधरानगर - रिता मेश्राम, इमामवाडा - मीना उमाळे, अजनी - छाया एडकेवार, हुडकेश्वर - कविता कोंकणे, पाचपावली - ए. पी. बावनकर, कळमना- छाया गुजर