मित्रांना फोन केला अन् दुचाकीसह तलावात उडी घेतली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:10 AM2021-07-14T04:10:29+5:302021-07-14T04:10:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वाडीतील एका तरुणाने आपल्या तीन मित्रांना आत्महत्या करायला जात असल्याचे फोनवरून सांगितले अन् काही ...

I called my friends and jumped into the lake with my bike | मित्रांना फोन केला अन् दुचाकीसह तलावात उडी घेतली

मित्रांना फोन केला अन् दुचाकीसह तलावात उडी घेतली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : वाडीतील एका तरुणाने आपल्या तीन मित्रांना आत्महत्या करायला जात असल्याचे फोनवरून सांगितले अन् काही वेळेनंतर दुचाकीसह फुटाळा तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. अथर्व राजू आनंदेवार (वय १९) असे मृताचे नाव आहे. सोमवारी दुपारी १२.३० च्या सुमारास ही थरारक घटना घडली.

आंबेडकरनगर कंट्रोलवाडी येथे राहणारा अथर्व रायसोनी कॉलेजमध्ये पॉलिटेक्निकचा प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता. त्याला एक मोठा भाऊ असून, तो खासगी जॉब करतो. वडील टाईल्स कंपनीत काम करतात, तर आई गृहिणी आहे. अथर्व त्याच्या मित्रांसोबत रविवारी सावनेरजवळच्या वॉटर पार्कला फिरायला गेला होता. तेथे त्याने मित्रांसोबत माैजमजाही केली. सायंकाळपर्यंत तो एकदम नॉर्मल होता.

सोमवारी दुपारी त्याने त्याच्या तीन मित्रांना फोन करून कॉन्फरन्सवर जोडले. आत्महत्या करण्यासाठी फुटाळा तलावावर जात असल्याचे अथर्वने सांगितले. त्यानंतर तो त्याच्या दुचाकी (एमएच ३१ - एफएम १०८८)ने गिट्टीखदानकडून वेगात फुटाळ्याकडे आला आणि त्याने दुचाकीसह तलावात उडी घेतली.

---

मित्रांच्या डोळ्यांदेखत तो पाण्यात बुडाला

अथर्वने फोनवरून आत्महत्या करीत असल्याचे सांगताच त्याच्या मित्रांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. दोनजण धावतपळत फुटाळ्यावर पोहोचले. मात्र, वेळ झाली होती. अथर्व पाण्यात गटांगळ्या खात होता. त्याला वाचविण्यासाठी मित्रांनी त्याच्या दिशेने तलावाच्या काठावरचे बांबू, बल्ली पाण्यात फेकले. आरडाओरड करून मदतही मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तातडीने मदत न मिळाल्याने मित्रांच्या डोळ्यांदेखतच तो पाण्यात बुडाला.

---

आत्महत्येेचे कारण अंधारात

या घटनेची माहिती मित्रांनी अथर्वच्या कुटुंबीयांना आणि पोलिसांना कळवली. त्यानुसार अंबाझरी ठाणेदार नरेंद्र हिवरे, पीएसआय ठाकरे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अग्निशमन दलाला बोलवून घेतले. अग्निशमन दलाच्या जवानांनी बरेच प्रयत्न केल्यानंतर आधी दुचाकी आणि नंतर अथर्वचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. अथर्वने आत्महत्या का केली, ते अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, अथर्वच्या आत्मघाती पावलामुळे त्याच्या कुटुंबीयांना जबर मानसिक धक्का बसला आहे. त्याच्या आईची प्रकृती बिघडली असून, तो राहत होता त्या आंबेडकरनगरातही शोककळा पसरली आहे.

----

Web Title: I called my friends and jumped into the lake with my bike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.