गर्लफ्रेण्ड मिळालीच नाही, नादात गमावले ८८ हजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 09:15 PM2021-07-22T21:15:09+5:302021-07-22T21:19:02+5:30
girlfriend club cheating गर्लफ्रेण्ड उपलब्ध करून देण्यासाठी मेंबरशिप घेण्याचा आग्रह धरून एका महिलेने दोन तरुणांचे ८८ हजार रुपये हडपले. या गुन्ह्याची तक्रार मिळाल्यानंतर पाचपावली पोलिसांनी बुधवारी या प्रकरणात गुन्हा दाखल केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर-गर्लफ्रेण्ड उपलब्ध करून देण्यासाठी मेंबरशिप घेण्याचा आग्रह धरून एका महिलेने दोन तरुणांचे ८८ हजार रुपये हडपले. या गुन्ह्याची तक्रार मिळाल्यानंतर पाचपावली पोलिसांनी बुधवारी या प्रकरणात गुन्हा दाखल केला.
आकाश मंगेश पखिडे (वय २१) असे तक्रारकर्त्याचे नाव आहे. तो महेंद्रनगरातील रहिवासी आहे. १६ सप्टेंबर २०२० ला त्याला एका आरोपीचा मेसेज आला. गर्लफ्रेण्ड क्लबची मेंबरशिप घेतल्यास विविध शहरात तुम्हाला देखण्या आणि श्रीमंत महिला-मुलींसोबत गाठभेट घालून दिली जाईल. तुम्ही तुमच्या काैशल्याने त्यांचे मन जिंकायचे आणि नंतर त्यांनी बोलविलेल्या वेळेवर तुम्ही त्यांच्यासोबत वेळ घालवायचा. त्यासाठी तुम्हाला मोठी रक्कम मिळेल. ७५ टक्के तुम्ही ठेवायची आणि २५ टक्के रक्कम आम्हाला द्यायची, असे कथित गर्लफ्रेण्ड क्लबच्या संचालकाने सांगितले. आकाशने त्याच्या थापेबाजीला बळी पडून २ हजार रुपये जमा केले. नंतर आकाशच्या मित्रालाही अशीच बतावणी करून गेल्या १० महिन्यात फोन करणारा आरोपी आणि सोनिया नावाची महिला यांनी गुगल पे च्या माध्यमातून ८६,१०० रुपये पाठविण्यास भाग पाडले. एवढी रक्कम घेऊनही कोणतीच गर्लफ्रेण्ड किंवा तिच्यासोबतची बैठक या दोघांसोबत आरोपींनी करून दिली नाही.
आरोपी वारंवार आंबटगोड थापा मारून नुसते पैसेच जमा करण्यास सांगत असल्याने आपली फसवणूक झाल्याचे आकाश तसेच मित्राच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी पाचपावली पोलिसांकडे तक्रार नोंदवली. चाैकशी केल्यानंतर पीएसआय राजेश खंडार यांनी बुधवारी या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. मोबाईल नंबरच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.