वैयक्तिक टीकेचे राजकारण मी करत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 10:06 AM2019-03-15T10:06:32+5:302019-03-15T10:06:59+5:30
निवडणुकीत वैयक्तिक टीकाटिप्पणी करणे मला पटत नाही. मी प्रचारादरम्यान वैयक्तिक टीकेचे राजकारण केले नाही व करणारही नाही, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात कॉंग्रेसने भाजपाचे माजी खासदार नाना पटोले यांना नागपुरातून उमेदवारी दिली आहे. नितीन गडकरी यांनी त्यांच्या उमेदवारीचे स्वागतच केले आहे. लोकशाहीत कुणालाही कुणाविरोधातही निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे. नाना पटोले यांनी पक्ष सोडला असला तरी त्यांच्यावर आशीर्वाद कायम राहतील. निवडणुकीत वैयक्तिक टीकाटिप्पणी करणे मला पटत नाही. मी प्रचारादरम्यान वैयक्तिक टीकेचे राजकारण केले नाही व करणारही नाही, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.
नागपुरात प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. कॉंग्रेसला आपला उमेदवार ठरविण्याचा अधिकार आहे व त्यांनी तो ठरविला आहे. जो उमेदवार असेल त्याने लढावे. नाना पटोले हे अगोदर आमच्या पक्षात होते. आता त्यांनी पक्ष सोडला याचा अर्थ ऋणानुबंध संपले असा होत नाही. मी राजकारणात कधीही कुणाशी शत्रुत्व ठेवले नाही व ठेवणारही नाही. पटोले यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असे प्रतिपादन गडकरी यांनी केले. मागील पाच वर्षांत मी जे काम केले आहे, त्याच्याच आधारावर मी जनतेमध्ये जाईल असेदेखील त्यांनी सांगितले.
टीकेचे राजकारण टिकत नाही
एकदा कायम झालेले ऋणानुबंध मी कुठल्याही परिस्थितीत तोडत नाही. निवडणुकांचा प्रचार या विकासकामे व जनतेचे मुद्दे यांच्या आधारावर व्हायला हव्या. तेच जनतेलादेखील अपेक्षित आहे. वैयक्तिक टीका करणे सोपे असते, मात्र असे राजकारण फार काळ टिकत नाही. टीकाटिप्पणीचे राजकारण लोकशाहीत अभिप्रेत नाही. प्रचाराची अशी दिशा राहू नये, असेदेखील नितीन गडकरी म्हणाले.