प्रवृत्त करीत नाही तो विचारच कसला
By Admin | Published: October 19, 2015 02:59 AM2015-10-19T02:59:07+5:302015-10-19T02:59:07+5:30
वैचारिक लिखाण हे जोखमीचे काम आहे. यात संबंधित लेखकास त्या विषयाचे आणि त्या विषयाशी संबंधीत सर्व क्षेत्राचे ज्ञान असावयास हवे.
गंगाधर पानतावणे : अशोक गोडघाटे यांच्या चार ग्रंथांचे प्रकाशन
नागपूर : वैचारिक लिखाण हे जोखमीचे काम आहे. यात संबंधित लेखकास त्या विषयाचे आणि त्या विषयाशी संबंधीत सर्व क्षेत्राचे ज्ञान असावयास हवे. परंतु जो विचार नवे काहीच देत नाही, वाचकाला प्रवृत्तही करीत नाही, असा विचार विचारच नसतो, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिक तथा ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रा. डॉ. गंगाधर पानतावणे यांनी केले.
विदर्भ साहित्य संघाच्या सांस्कृतिक संकुलात प्रा. अशोक गोडघाटे यांच्या ‘मानव मुक्तीचा मार्गदाता भगवान बुद्ध’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक आव्हान’, ‘सामाजिक सांस्कृतिक जाणिवा’ आणि ‘दलितांचा विचार संघर्ष या ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बुद्ध-आंबेडकरी तत्त्वज्ञानाचे भाष्यकार भंते विमलकित्ती गुणसिरी होते.
व्यासपीठावर प्रा. रत्नाकर मेश्राम यांची उपस्थिती होती. गंगाधर पानतावणे म्हणाले, काही लेखक मूळ विषयाबाबत विचार व्यक्त न करता त्या विषयाच्या काठावरचे विचार मांडतात. त्यांचे विचार भविष्यात असत्य ठरतात. परंतु अशोक गोडघाटेंच्या ग्रंथात विचारवैभव आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखनात जसजसे वाचन करतो तसे नवनवे प्रतीत होते. ते संदर्भाशिवाय कधीच बोलले नाही, हे तरुण लेखकांनी लक्षात घेण्याची गरज आहे. आत्मगौरव करणाऱ्या लेखनाने प्रतिमा निर्मिती होत नाही. त्यामुळे क्षणापुरता आनंद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
भंते विमलकित्ती गुणसिरी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा समता, न्यायाचा विचार गोडघाटेंच्या पुस्तकातून मांडण्यात आल्याचे सांगितले. अशोक गोडघाटे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ओझरत्या व्यक्तिमत्त्वाचा उल्लेख करण्याचा प्रयत्न या ग्रंथातून केल्याचे सांगितले. कार्यक्रमात पं. प्रभाकर धाकडे आणि त्यांच्या संचाने स्वागतगीत आणि भीमगीत सादर केले. प्रमोद रामटेके, पं. प्रभाकर धाकडे, रवींद्र कडवे यांचा सत्कार करण्यात आला. संचालन अशोक जांभुळकर यांनी केले. आभार रत्नाकर मेश्राम यांनी मानले. (प्रतिनिधी)