मी भ्रष्टाचाराचे समर्थन करत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:10 AM2021-02-26T04:10:22+5:302021-02-26T04:10:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मी भ्रष्टाचाराचे समर्थन करत नाही. मात्र, तो आता यंत्रणेचा भाग बनला हे कटू ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मी भ्रष्टाचाराचे समर्थन करत नाही. मात्र, तो आता यंत्रणेचा भाग बनला हे कटू वास्तव लक्षात घ्यायला हवे. त्याला १०० टक्के संपविणे शक्य नाही. कठोर कारवाई हाच भ्रष्टाचाऱ्यांना वठणीवर आणण्याचा एकमात्र उपाय आहे, असे मत राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना मांडले. यावेळी पोलीस आयुक्त अमितेशकुमार हजर होते. नगराळे यांनी शहरातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
अन्य विभागांच्या तुलनेत एसीबीने पोलिसांवर केलेल्या कारवाईचा आकडा जास्त आहे याकडे त्यांचे लक्ष वेधले असता, त्यांनी पोलीसच नव्हे, तर सर्वच विभागांत तो फोफावल्याचे म्हटले. अधिकाऱ्यांनी कनिष्ठांच्या चौकशी प्रक्रिया व प्रणालीतील सहभागावर लक्ष दिले पाहिजे. काही प्रकरणांत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संमतीनेच कनिष्ठ अधिकारी भ्रष्टाचार करतात. मात्र, १०० टक्के प्रकरणात ही बाब लागू होत नाही, असेही त्यांनी सांगितले. तत्पूर्वी, त्यांनी कोरोना काळात कर्तव्यावर असलेल्या ज्या पोलिसांचे निधन झाले त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना पोलीस दलात अनुकंपा तत्त्वावर तातडीने सामावून घेण्याचे धोरण राबविले जात असल्याची माहिती दिली. गेल्या तीन दिवसांत मुंबई आणि कोकण भागात ८३, ठाण्यात ७० आणि नागपुरात ३० जणांना नोकरीचे नियुक्तीपत्र देण्यात आल्याची माहिती दिली. पोलिसांना कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून मुंबईत सकाळी आणि सायंकाळी अशा दोन शिफ्टमध्ये पोलिसांना कर्तव्यावर बोलविले जात आहे. इतर ठिकाणी त्या-त्या ठिकाणचे आयुक्त आणि अधीक्षक सोयीनुसार निर्णय घेणार असल्याचेही नगराळे यांनी स्पष्ट केले.
राज्यातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी मकोका, एमपीडीए, तडीपारीसारखे जास्तीत जास्त निर्णय घेऊन सराईत गुंडांना कारागृहात डांबले जात आहे. नागपुरात मध्यंतरी हत्येचे गुन्हे वाढले होते. आता अधिक कठोेर कारवाई केली जात असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे नगराळे म्हणाले. राज्यात २० हजार पदे रिक्त असल्याचे सांगून वेल्फेअर संबंधाने बरेच काही करायचे आहे, असेदेखील त्यांनी सांगितले.
पूजा चव्हाण प्रकरणात दबाव नाही
पूजा चव्हाण प्रकरणाच्या संबंधाने आपण तूर्त काही बोलणार नाही. पुणे पोलीस या प्रकरणाचा कसून आणि योग्य पद्धतीने तपास करीत आहेत. चाैकशीत काय ते पुढे येईल, असेही ते म्हणाले. या प्रकरणात राजकीय दबावाचा मुद्दा नगराळे यांनी फेटाळून लावला.
‘त्या’ प्रकाराची चौकशी करू
भाजप नेत्यांना पोलीस ठाण्यातून हाकलून लावण्याच्या प्रकाराकडे पोलीस महासंचालकांचे लक्ष वेधले असता, असे घडले तर ते गंभीर आहे. त्याची आपण चाैकशी करू. पोलीस ठाण्यात आलेल्यांना सन्मानाची वर्तणूक मिळालीच पाहिजे. पोलीस ठाणेच नव्हे, तर एसपी, डीसीपी, आयजी, सीपी किंवा डीजींच्याही ऑफिसमध्ये कुणी येत असेल तर त्याची तक्रार सन्मानाने ऐकून घेतली पाहिजे. तो प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे, असेही नगराळे म्हणाले.
----