कोरोना असला तरी खेळणे थांबविणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2020 11:20 AM2020-10-31T11:20:20+5:302020-10-31T11:34:46+5:30
Nagpur News sports बॅडमिंटनपटू मालविका बन्सोड म्हणाली, ‘मी निकालाची काळजी करीत नाही. मी अनुभवी खेळाडूविरुद्ध खेळले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नीलेश देशपांडे
नागपूर : खेळामुळे मानसिक व शारीरिक कणखरता येते असे म्हटल्या जाते. त्यामुळे सकारात्मकता येते. नागपूरची प्रतिभावान बॅडमिंटनपटू मालविका बन्सोड अलीकडेच जर्मनी येथे आयोजित सारलोरलक्स ओपन बीडब्ल्यूएफ टूर सुपर १०० बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अन्य भारतीय खेळाडूंसोबत गेली होती. दुर्दैवाने भारतीय बॅडमिंटनपटू गतविजेता लक्ष्य सेन, अजय जयराम आणि शुभांकर डे यांना स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. त्यांना क्वारंटाईन व्हावे लागले. लक्ष्य सेनचे प्रशिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते आणि हे खेळाडू त्यांच्या संपर्कात आले होते. सुदैवाने मालविका मात्र संपर्कात नसल्यामुळे तिला खेळायची संधी मिळाली. तेथे तिला पहिल्याच फेरीत पराभव स्वीकारावा लागला.
स्पर्धेच्या अनुभवाबाबत बोलताना मालविका म्हणाली, ‘सात महिने घरी घालविल्यानंतर स्पर्धेत सहभागी होण्यास उत्सुक होते. त्याचप्रमाणे ही वर्षातील अखेरची आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती. सूर गवसणे महत्त्वाचे होते. मी सुदैवाने रविवारी भारतात पोहचत आहे. कारण जर्मनीमध्ये २ नोव्हेंबरपासून पुन्हा दुसऱ्यांदा लॉकडाऊन सुरू होत आहे. विमान प्रवासात मी फिजिकल डिस्टन्सिंग राखण्यावर भर दिला. स्पर्धेदरम्यान बरीच सावधगिरी बाळगली. कारण एक चूकही महागात पडण्याची शक्यता होती. निवास व्यवस्था असलेल्या हॉटेलमध्ये कोरोनापासून बचावाची पूर्ण उपाययोजना होती. बीडब्ल्यूएफच्या निर्देशानुसार स्पर्धेचा हॉल वारंवार सॅनिटाईज करण्यात येत होता. गर्दी टाळण्यासाठी आयोजकांनी विशेष व्यवस्था केली होती.’
पहिल्याच फेरीत गारद झालेली मालविका म्हणाली, ‘मी निकालाची काळजी करीत नाही. मी अनुभवी खेळाडूविरुद्ध खेळले. मी सिनिअर पातळीवर केवळ पाच स्पर्धा खेळले आहे तर क्रिस्टीन २५० पेक्षा अधिक स्पर्धामध्ये सहभागी झाली आहे. मी यापूर्वी कधीच युरोपियन प्रतिस्पर्ध्याविरुद्ध खेळलेली नाही. त्यामुळे हा अनुभव चांगला होता.’ नकारात्मक स्थितीत मुलगी जर्मनीला स्पर्धा खेळायला गेली याचा अभिमान वाटतो, अशी प्रतिक्रिया मालविकाची आई तृप्ती यांनी दिली.