साखरेपेक्षा गुळच खातोय भाव !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:06 AM2021-06-30T04:06:56+5:302021-06-30T04:06:56+5:30
नागपूर : बाजारात साखरेपेक्षा गुळालाच जास्त भाव आहे. आधी गूळ गरिबांसाठी आणि साखर श्रीमंतीचे लक्षण समजले जायचे. हे गणित ...
नागपूर : बाजारात साखरेपेक्षा गुळालाच जास्त भाव आहे. आधी गूळ गरिबांसाठी आणि साखर श्रीमंतीचे लक्षण समजले जायचे. हे गणित आता उलटे झाले आहे. कोरोना काळात लोकांची गुळाला पसंती आणखी वाढली आहे. सकस, संतुलित आहाराबाबत जनजागृती आणि आहारतज्ज्ञ गुळाचे महत्त्व पटवून देत आहेत. काही घरात चहातून साखर बाद झाली असून, त्याची जागा गुळाने घेतली आहे. गेल्या पाच वर्षांपासून साखरेपेक्षा गूळ जास्त भाव खात असल्याचे बाजारपेठांमधील किमतीवरून दिसून येत आहे.
नागपूर जिल्ह्यात प्रति किलो साखर ३५ ते ३६ रुपये आणि गूळ ४८ ते ५५ यादरम्यान आहे. नैसर्गिक गूळ १०० रुपयांवर आहे. ऑक्टोबर ते मार्चपर्यंत गुळाचे दर कमी असतात. मार्चनंतर दर वाढतात. कोल्हापूरमध्ये निर्मित गुळाची किंमत जास्त असते. सध्या मेंगळुरू आणि मध्य प्रदेशातून गुळाची आवक बंद आहे. गुळाचे दर पूर्वीपासूनच जास्त आहेत. कोरोनापूर्वी गुळाला उठाव जास्त नव्हता. पण कोरोनानंतर गूळ आरोग्यासाठी फायद्याचा असल्याचे महत्त्व लोकांना पटल्यानंतर विक्री वाढली. नैसर्गिक गुळाला जास्त मागणी असल्याचे व्यापारी म्हणाले. महाराष्ट्रमध्ये उसापासून बनविलेला गूळ जास्त वापरतात. रसायनयुक्त आणि नैसर्गिक म्हणजे सेंद्रिय असे दोन प्रकारांचे गूळ बाजारात येत आहेत. चहासाठी, काढ्यासाठी साधारण गुळाचा वापर होतो.
प्रकृतीसाठी गूळ चांगला
जीवनसत्व आणि खनिज तत्त्वांनी भरलेला गूळ त्वचेवर एक छान चमक आणतो आणि सर्व मुरुम, पुरळ आणि डाग नाहीसे करण्यास मदत करतो. रसायनमुक्त आणि पोषक गूळ आरोग्यदायी आणि प्रकृतीसाठी चांगला आहे. पण आपल्याला मधुमेह किंवा अन्य काहीही आजार असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊनच पुढचे पाऊल टाकणे फायद्याचे ठरेल.
सोनाली बुटे, आहारतज्ज्ञ.
शहरात साखरेपेक्षा गुळालाच मागणी :
गूळ आरोग्यदायी असल्याचे महत्त्व लोकांना पटल्यानंतर गत पाच वर्षांपासून गुळाला मागणी वाढली आहे. साखरेपेक्षा गूळ महाग आहे. सारखेच्या प्रमाणात मागणी फारच कमी आहे. पण गेल्या दीड वर्षांपासून लोकांकडून गुळाची खरेदी वाढली आहे. साखर आणि गुळाच्या किमतीत १२ ते १५ रुपयांचा फरक आहे.
विशाल पंचमतिया, व्यापारी.
पूर्वीपेक्षा गुळाची विक्री वाढली आहे. पूर्वी सणालाच गुळाची खरेदी व्हायची. कोरोनानंतर नैसर्गिक गुळाची मागणी वाढली आहे. लोकांच्या महिन्याच्या खरेदीत गुळाला प्राधान्य मिळाले आहे. नैसर्गिक गुळाची किंमत १०० रुपयावर असतानाही प्रत्येक जण अर्धा वा किलो गूळ खरेदी करतोच. भविष्यातही मागणी वाढणार आहे.
कन्हैयालाल मगनानी, व्यापारी.
गावात मात्र साखरच !
पूर्वी गावात गुळाची विक्री जास्त व्हायची, पण आता गावाच्या विकासासोबतच साखरेची विक्री वाढली आहे. आता साखर आणि गुळाच्या व्यवसायाचे गणित उलटे झाले आहे. गावात गुळाऐवजी साखरेचा उपयोग जास्त होत असल्याने विक्री जास्त होते. काहीच लोक महाग नैसर्गिक गुळाची मागणी करतात.
विजय समर्थ, दुकानदार.
गुळाचा चहा बनले स्टेटस
गुळाचा चहा हा शरीरासाठी फायदेशीर आहे. आरोग्याच्या दृष्टीने गुळाच्या चहाला प्राधान्य देतो. त्यामुळे शरीराला खनिज तत्त्वे मिळून प्रकृती चांगली राहते. लोकांना गुळाचे महत्त्व पटले आहे. नैसर्गिक गूळ महाग असल्यानंतरही लोक खरेदी करतात. घरी सर्वांनाच गुळाचा चहा घेण्यासाठी प्रोत्साहन देतो. एखाद्या दिवशी ते सुद्धा गुळाचा चहा घेतात, पण सवय नसल्याने ते अखेर साखरेकडे वळतात. गुळाचे सेवन केल्याने कुणीही आजारी पडल्याने दिसून येत नाही.
सीताराम भोंगाडे, ८० वर्षे.
असा वाढला गुळाचा भाव (प्रति किलो दर)
साखर गूळ
२००० १७ १५
२००५ १९ १८
२०१० ३० २५
२०१५ २६ ३३
२०२० ३३ ४२
२०२१ ३६ ४८