अन् मिसेस सीएम झाल्या ‘पास’
By admin | Published: November 16, 2014 12:48 AM2014-11-16T00:48:59+5:302014-11-16T00:48:59+5:30
शिकावू परवाना घेण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात गेल्यानंतर नेमके काय करायचे हे माहीत नसल्यानेच उच्चशिक्षित मंडळीदेखील एजंटची मदत घेतात, तर काही आपल्या अधिकाराचा गैरफायदा घेऊन
आरटीओ : वाहन परवाना चाचणीत घेतले २० पैकी १८ गुण
सुमेध वाघमारे - नागपूर
शिकावू परवाना घेण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात गेल्यानंतर नेमके काय करायचे हे माहीत नसल्यानेच उच्चशिक्षित मंडळीदेखील एजंटची मदत घेतात, तर काही आपल्या अधिकाराचा गैरफायदा घेऊन कामे काढून घेतात. परंतु मिसेस सीएम यांनी शनिवारी नवीन पायंडा पाडून सर्वांनाच आश्चर्यचकित केले. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस सामान्यांप्रमाणे आरटीओत आल्या. लर्निंग लायसन्ससाठी रांगेत लागल्या. छायाचित्र काढून घेतले. संगणक चाचणी परीक्षा दिली आणि २० पैकी १८ गुण घेऊन पासही झाल्या.
नागपूर शहर आरटीओ कार्यालयाचे एजंटला फाटा देणाऱ्या विविध उपाययोजना लागू करण्यामध्ये नेहमीच प्रयत्न राहिले आहे. वाहन चालविण्याचा शिकावू परवाना (लर्निंग लायसन्स) मिळण्यासाठी नुकत्याच सुरू केलेल्या आॅनलाईन अर्ज करण्याच्या योजनेमुळे तर कुणा मध्यस्थाची वा माहीतगाराच्या मदतीची गरजच उरलेली नाही. असे असतानाही, एजंटची मदत घेणाऱ्यांची संख्या कमी झाले नसल्याचे चित्र आहे, तर आपल्या अधिकाराच्या जोरावर दबाव आणून कामे काढून घेणारे काही महाभागही आहेत. याचा रोजच प्रत्यय येत असलेल्या आरटीओ कार्यालयाला आज मात्र वेगळाच अनुभव आला. मिसेस सीएम अमृता फडणवीस यांनी लर्निंग लायसन्ससाठी आॅनलाईन अर्ज भरला. यात शनिवारी दुपारी ११.३० वाजताची वेळ घेतली. वेळेच्या १५ मिनिटांपूर्वी त्या कार्यालयात पोहचल्या. तोपर्यंत कुणालाच याची माहिती नव्हती. सहायक मोटार वाहन निरीक्षक संदीप पाटील यांच्याकडे त्यांनी जेव्हा लर्निंग लायसन्सचा अर्ज सादर केला, तेव्हा कुठे कार्यालयाला याची माहिती मिळाली.
प्रादेशिक परिवहन अधिकारी सर्जेराव शेळके रजेवर असल्याने व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण कार्यालयीन कामासाठी न्यायालयात असल्याने सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी दत्ता सांगोळकर हे त्यांच्यासेवेत हजर झाले. परंतु कोणाकडूनच त्यांनी कुठलीही मदत घेतली नाही. सामान्य व्यक्तीप्रमाणे रांगेत लागून संपूर्ण सोपस्कार पार पाडले. विशेष म्हणजे, भल्याभल्यांना घाम आणणाऱ्या संगणक परीक्षेलाही त्या सामोरे गेल्या. त्यावेळी त्यांच्यासोबत आणखी ३० उमेदवार परीक्षा देत होते. कुणालाच याची माहिती नव्हती. १५ मिनिटांच्या परीक्षेत त्यांनी २० पैकी १८ गुण घेतले. त्या पास झाल्या.