मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेण्याचा मला अधिकार नाही; देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
By कमलेश वानखेडे | Published: September 6, 2024 06:03 PM2024-09-06T18:03:47+5:302024-09-06T18:04:30+5:30
Nagpur : महायुतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख, त्यांचा नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढू
नागपूर : महायुतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख आहे, त्यांचा नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढत आहे. विनाकारण ‘कन्फ्युजन’ तयार करण्याचे कारण नाही. हा निर्णय घेण्याचा आधिकार माझा स्तरावर नाही, यावर बोलण्याचा अधिकार मला नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
शनिवारी नागपूर महापालिकेतील विकास कामांची आढावा बैठक आटोपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री पदासंदर्भात आमचे पार्लमेंटरी बोर्ड आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन्ही नेते मिळून सगळे निर्णय करतील. याचा निर्णय अगोदर करायचा की नंतर याचाही निर्णय तेच करतील. यासंदर्भात कुठलेही बोलण्यात अधिकार मला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. जे संवेदनशील असतात ते माफी मागतात. जे मुजोरी करता कशा पद्धतीने भाषण करतात काल आपण राहुल गांधीच्या भाषणातून पाहिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात संवेदनशीलता आहे म्हणून त्यांनी माफी मागितली, पण मुजोरांच्या ते कधी लक्षात येऊ शकत नाही, अशी टीकाही फडणवीस यांनी केली.