मी ठाले पाटलांचा उमेदवार हा प्रचार चुकीचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 01:43 AM2017-11-02T01:43:57+5:302017-11-02T01:44:09+5:30
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षाची निवडणूक लढवण्यामागे माझी भूमिका स्वच्छ आहे. मराठीच्या हितासाठी मी या रिंगणात उतरलोय.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षाची निवडणूक लढवण्यामागे माझी भूमिका स्वच्छ आहे. मराठीच्या हितासाठी मी या रिंगणात उतरलोय. मी कौतिकराव ठाले पाटलांचा प्रायोजित उमेदवार आहे, असा प्रचार कुणी करत असेल तर तो चुकीचा आहे. प्रांतवाद मला मान्य नाही. मी अखिल भारतीय उमेदवार आहे आणि वाङ्मयीन क्षेत्रातील माझ्या गुणवत्तेच्या बळावर मी मतदारांना कौल मागतोय, अशा शब्दात ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षदाचे उमेदवार लक्ष्मीकांत देशमुख यांनी आपली भूमिका विशद केली. लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी त्यांच्या मराठीच्या विकासाबाबतच्या कल्पना आणि निवडणुकीला उभे राहण्यामागच्या कारणांची चर्चा केली. देशमुख पुढे म्हणाले, ही निवडणूक मला दंगल वाटत नाही.
हा शारदेचा उत्सव आहे. भाषेच्या हितासाठी कोणता उमेदवार योग्य राहील, याचा निर्णय सूज्ञ मतदारांनी घ्यायचा आहे. मी माझ्या लेखणीद्वारे सातत्याने वाङ्मयीन योगदान देत आलो आहे. फक्त लेखणीच नव्हे तर कृतीतूनही माझे कार्य अखंड सुरूच आहे. परभणीत माझ्या पुढाकाराने व लोकसहभागातून मराठवाड्याचे प्रसिद्ध कवी बी. रघुनाथ यांचे ८० लाखांचे देखणे स्मारक उभे राहिले. संत ज्ञानेश्वरांच्या आळंदीतूनही मी नवोदितांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रयत्नरत आहे. मतदार या सर्व गोष्टींचा विचार नक्की करतील याचा मला विश्वास आहे, याकडेही लक्ष्मीकांत देशमुख यांनी लक्ष वेधले.
संमेलनाध्यक्ष झालो तर हे करणार
आज मराठीची अवस्था खरच चिंतनीय आहे. हे चित्र बदलण्यासाठी व मराठीला ग्लोबल भाषा करण्यासोबतच तिला तरुणाईच्या अभिव्यक्तीचे माध्यम बनविण्यासाठी माझ्या काही कल्पना आहेत. त्या कृतीत उतरवण्यासाठी मी संमेलनाध्यक्षपदाचा पूर्ण क्षमतेने वापर करणार आहे. याशिवाय इंग्रजी माध्यमांच्या शाळेतही दहावीपर्यंत मराठी आवश्यक केली जावी, बृहन्महाराष्ट्रातील मराठी साहित्य मंडळांना हक्काचे सभागृह लाभावे, यासाठी मी प्रयत्न करणार आहे. यासोबतच मराठी चित्रपट, नाटक आणि काव्याधारित भावसंगीत यांचे महत्त्व लक्षात घेऊन माझे काही चिंतनही मला मांडायचे आहे.