जन्मांध परि मी, यशोप्रकाश पाहतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2016 02:50 AM2016-05-26T02:50:02+5:302016-05-26T02:50:02+5:30

आयुष्यात सृष्टीतील रंगांना स्थानच नसताना दु:खाला न कवटाळता लहान वयातच त्याने विद्येच्या प्रकाशाला जवळ केले.

I look at Yashashoprakash (life time) | जन्मांध परि मी, यशोप्रकाश पाहतो

जन्मांध परि मी, यशोप्रकाश पाहतो

Next

अनिकेतचे प्रेरणादायी यश : रुग्णवाहिकेमधून गाठले होते परीक्षा केंद्र, हाताला सलाईन लावून दिला पेपर
योगेश पांडे नागपूर
आयुष्यात सृष्टीतील रंगांना स्थानच नसताना दु:खाला न कवटाळता लहान वयातच त्याने विद्येच्या प्रकाशाला जवळ केले. अनेक अडचणींचा सामना करत बारावीच्या वर्षभरात अथक कष्ट घेऊन अभ्यास केला. परंतु संकटांनी अखेरपर्यंत पिच्छा सोडला नाही. परीक्षेच्या चार दिवस अगोदर आजारी पडल्यामुळे रुग्णालयातच दाखल व्हावे लागले. आता तो पेपर देऊच शकणार नाही असे सर्वांना वाटले. परंतु त्याने हिंमत दाखविली. थेट रुग्णवाहिकेने परीक्षा केंद्र गाठले अन् हाताला ‘सलाईन’ असतानादेखील पूर्ण पेपर लिहिला.

बुधवारी बारावीचा निकाल जाहीर झाला अन् खऱ्या अर्थाने त्याची जिद्द जिंकली. दृष्टीहिनांमधून त्याने शहरात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. हिस्लॉप महाविद्यालयातील विद्यार्थी अनिकेत बेंडे याचे यश हताश झालेल्या विद्यार्थ्यांना लढण्याची नवी प्रेरणा देणारे आहे.
जन्मापासूनच पूर्णत: अंध असलेल्या अनिकेत दिनकर बेंडे याने कला शाखेत ८८.३० टक्के गुण मिळविले आहेत. दहावीत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाल्यानंतरदेखील अनिकेतने विज्ञान शाखेत प्रवेश न घेता कला शाखेची निवड केली. कारण त्याचे ध्येय आहे. त्याला भारतीय प्रशासकीय सेवेत जायचे आहे. वडील दिनकर बेंडे, आई मनीषा बेंडे व भाऊ अभिलाश बेंडे यांच्या प्रोत्साहनामुळे त्याने शिकवणीदेखील न लावण्याचा निर्णय घेतला व स्वत:च्या बळावरच बारावीचा अभ्यास सुरू केला. वर्षभर त्याने जीव लावून अभ्यास केला होता.
१८ फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षा सुरू होणार होती. परंतु १४ तारखेला अचानक अनिकेतची तब्येत खराब झाली व त्याला थेट रुग्णालयातच दाखल करावे लागले. अशा स्थितीत अनिकेतने पेपर देऊ नये असेच सल्ले त्याला अनेकांकडून देण्यात आले. तो पेपर देऊ शकेल की नाही याबाबत त्याचे कुटुंबीयदेखील साशंक होते. परंतु अनिकेतला या परीक्षेचे महत्त्व चांगल्याने माहीत होते. त्यामुळे त्याने परीक्षा देण्याचा निर्णय घेतला व घरच्यांनीदेखील त्याला मानसिक पाठबळ दिले.
पहिल्या तीन पेपरसाठी कुठलाही अभ्यास न करता अनिकेत चक्क रुग्णवाहिकेतून परीक्षा केंद्रावर गेला. हाताला ‘सलाईन’ असतानादेखील त्याने पूर्ण पेपर लिहिला. वर्षभर मन लावून अभ्यास केल्यामुळे त्याला पेपर लिहिताना फारशी अडचण गेली नाही.

अनिकेतला व्हायचेय प्रशासकीय अधिकारी
परीक्षेच्या ऐन वेळेवर आजारी पडल्यामुळे मला दडपण आले होते. परंतु काहीही करून मला पेपर द्यायचेच होते. मला यश मिळाल्याचे समाधान आहे. मला आता दिल्ली किंवा पुण्यातून कला शाखेत पदवी प्राप्त करायची आहे आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा द्यायची आहे. मला माझ्या कुटुंबीयांकडून फार प्रोत्साहन मिळाले व त्यांच्यामुळेच मी जिद्द दाखवू शकलो, अशा भावना अनिकेतने व्यक्त केल्या. अनिकेतला संगीताचा छंद असून तो स्वत: विविध ‘कम्पोझिशन्स’ तयारदेखील करतो. बारावीच्या वर्षातदेखील त्याने छंदाला स्वत:पासून वेगळे होऊ दिले नव्हते हे विशेष.

Web Title: I look at Yashashoprakash (life time)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.