मला ‘कार्यकर्ता संमेलनाध्यक्ष’ व्हायचेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 12:22 AM2017-11-05T00:22:54+5:302017-11-05T00:23:08+5:30
मी ‘ग्लोकल’ लेखक आहे. शेतीपासून तर जागतिक दहशतवादापर्यंत मी लिहिले आहे. मी स्वत:ला प्रेमचंद परंपरेचा पाईक मानतो आणि साहित्याला पुरोगामी विचारांची चळवळ समजतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मी ‘ग्लोकल’ लेखक आहे. शेतीपासून तर जागतिक दहशतवादापर्यंत मी लिहिले आहे. मी स्वत:ला प्रेमचंद परंपरेचा पाईक मानतो आणि साहित्याला पुरोगामी विचारांची चळवळ समजतो. त्यामुळे मला नुसते संमेलनाध्यक्ष नव्हे तर ‘कार्यकर्ता संमेलनाध्यक्ष’ व्हायचे आहे आणि माझ्या या भूमिकेला वैदर्भीय मतदारांचा शंभर टक्के पाठिंबा मिळेल याचा मला पूर्ण विश्वास आहे, असा आशावाद अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदाचे उमेदवार लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केला. शनिवारी नागपुरातील विदर्भ साहित्य संघात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. देशमुख पुढे म्हणाले, मी जिल्हाधिकारी असताना कादंबºया लिहिल्या. क्रीडाकथा हा नवा प्रकार मी साहित्यात आणला. हे माझे वाङ्मयीन संचित आहे. या बळावरच मी या निवडणुकीला सामोरे जात आहे. कुठल्याही वादात आपण पडायचे नाही, हे पथ्य मी कटाक्षाने पाळले आहे. आपण आपल्याच कामाचे मूल्यमापन करणे योग्य नाही. मला माझ्या सर्व प्रतिस्पर्ध्यांबद्दल सन्मान आहे. मतदार सूज्ञ आहेत. ते योग्यच निर्णय घेतील याचा मला विश्वास आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
मला का नाही मिळणार विदर्भाचा पाठिंबा?
मी लिहिताना कधी प्रांताचा भेद पाळला नाही. माझे लेखन सार्वत्रिक आहे, त्यामुळे माझ्या लिखाणावर प्रेम करणारेही सर्वत्र आहेत. त्याला विदर्भ अपवाद नाहीच. येथे दोन उमेदवार आहेत म्हणून मला मते मिळणार नाहीत, हा अंदाज चुकीचा आहे. मी आज वि.सा. संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकरांना भेटलो, इतर मतदारांशीही भेटीगाठी झाल्या. याचा सकारात्मक परिणाम निकालात दिसेलच.
वयाचा विषयच नाही, लिखाण सकस हवे
संमेलनाध्यक्ष साठीच्या आतला की बाहेरचा, हा विषयच हास्यास्पद आहे. वयाचा आणि लेखनाचा काय संबंध आहे? लिखाण सकस आणि दर्जेदार असायला पाहिजे. मग वय २५ वर्षे असो वा ७० वर्षे यातला कुणीही संमेलनाध्यक्ष होऊ शकतो.