मी ५ मिनिटं बाहेर गेलो.. परतलो तर डोळ्यांदेखत... नागपूर स्फोटात बचावलेल्यांची कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 06:53 AM2023-12-18T06:53:08+5:302023-12-18T06:53:41+5:30
रविवारी सकाळी सहापासूनच्या शिफ्टमध्ये सीबीएच-२ प्लांटमध्ये काम सुरु केले होते.
नागपूर : हो! पाचच मिनिटांसाठी मी बाहेर आलो अन् जीव वाचला... त्या पाच मिनिटांचा थरारक घटनाक्रम दुर्घटनेतून वाचलेले कामगार संजय गुलाबराव आडे (वय ५१) यांनी सांगितला. मी २० वर्षांपासून कंपनीत काम करतो.
रविवारी सकाळी सहापासूनच्या शिफ्टमध्ये सीबीएच-२ प्लांटमध्ये मी कामावर होतो. युनिटमधील सुपरवायझर मोसम राजकुमार पटले यांनी रिकामे खोके युनिटबाहेर नेण्यास सांगितले. मी ते खोके घेऊन बाहेर गेलो. परत ठेवून आत येत असताना अगदी मी १०० मीटर अंतरावर असताना हा भीषण स्फोट झाला अन् सारं स्तब्ध झालं. डोळ्यादेखत इमारत उंच उसळून खाली कोसळली. त्यात त्या सुपरवायझरसह नऊजण गेले. तो प्रसंग आठवताना आडे यांना धस्स होतं.
जायचं होतं माहेरी, पण काळानं घेतला जीव, पोरांचं काय?
पतीला हातभार लागावा म्हणून रुमिता विलास उईके हिने कंपनीत कामाला सुरवात केली. दोघांनी मुलांच्या शिक्षणाचे स्वप्न पाहिले होते. मात्र स्फोटात तिचा मृत्यू झाला. रुमिताचे वडील देवीदास नत्थूजी इरपाती (धामणगाव, जि. नागपूर) हे शुक्रवारीच लेकीच्या भेटीला तिच्या घरी गेले होते व तिने रविवारी माहेरी येण्याचे कबूलही केले होते. मात्र रविवारी सुटी असतानादेखील ती कामाला गेली. ती परतलीच नाही.