अभिमान वाटेल असेच काम माझ्या हातून घडेल
By Admin | Published: December 29, 2014 02:47 AM2014-12-29T02:47:10+5:302014-12-29T02:47:10+5:30
सरस्वती शाळेने मला जीवनात खूप काही शिकविले. त्यामुळेच मी यशस्वी झालो. सरस्वती परिवाराने दिलेल्या प्रेमाचा स्वीकार करतांनाच माझ्या सर्व मित्रांना अभिमान वाटेल असेच काम ..
नागपूर : सरस्वती शाळेने मला जीवनात खूप काही शिकविले. त्यामुळेच मी यशस्वी झालो. सरस्वती परिवाराने दिलेल्या प्रेमाचा स्वीकार करतांनाच माझ्या सर्व मित्रांना अभिमान वाटेल असेच काम माझ्या हातून घडेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला.
सरस्वती शाळेतील प्रांगणात ५५ बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्याचा आगळावेगळा उपक्रम राबवून आपल्याच शाळेतील विद्यार्थी मुख्यमंत्री झाल्याचा आनंदोत्सव साजरा केला. मु्ख्यमंत्री यांच्यासह आई सरिता फडणवीस, अमृता देवेंद्र फडणवीस आणि द्विविजा फडणवीस यांचा गौरव करण्यात आला.
सरस्वतीयन्सच्या ५५ बॅच एकत्र येण्याचा हा बहुदा पहिलाच उपक्रम असल्याचे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की, युनायटेड नेशनमध्ये बोलण्याच्या संधीपेक्षाही आपल्या शाळेत बोलण्याची संधी मिळणे हा प्रसंग अत्यंत महत्त्वाचा आहे. या शाळेने दिलेल्या जीवनमूल्यामुळेच सामाजिक क्षेत्रात कार्य करण्याची प्रेरणा मिळाली. सरस्वती शाळेतील विद्यार्थीदशेतील आठवणींना त्यांनी उजाळा दिला. फडणवीस यांच्यासह ५५ बॅचेसचे माजी विद्यार्थी आणि माजी शिक्षकांचा ग्रुप फोटो काढण्यात आला. आपल्या सहपाठकाला मानाचा मुजरा करण्यासाठी १९५९ ते २०१४ पर्यंतचे १ हजार ४०० पेक्षा जास्त माजी विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. प्रारंभी वीरकरे यांनी स्वागतपर भाषण केले. माजी विद्यार्थी राकेश पुरोहित आणि शिक्षिका सावित्री यांनी फडणवीस यांच्या शालेय जीवनाविषयी माहिती दिली. आभार आयोजन समितीचे प्रमुख डॉ. अनुप मरार यांनी मानले. या सोहळ्याच्या आयोजनासाठी मुख्याध्यापक प्रभू रमण, संस्थेच्या अध्यक्षा सी.आर. सुब्रमण्यम, श्रीमती जिचकार, अलोक यादव, निखिल मुंडले, श्रीकृष्ण बुटी, डॉ. अनुप मरार, रिता बुधे, राजेश संघानी, राजेंद्र कुळकर्णी, विवेक मिश्रा, अमोल काळे यांनी परिश्रम घेतले.(प्रतिनिधी)