फडणवीस, पटेल यांच्या विरोधातच लढणार : नाना पटोले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 07:43 PM2018-01-04T19:43:18+5:302018-01-04T19:45:12+5:30
भाजपाला रामराम ठोकल्यानंतर माजी खासदार नाना पटोले यांनी भाजप नेत्यांवर हल्ले वाढविले आहेत. आता तर त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिले आहे. भंडारा-गोदिंया लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उमेदवार म्हणून उतरले किंवा भाजपाने राष्ट्रवादीचे नेते खा. प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी दिली तर त्यांच्या विरोधात आपण निवडणूक लढू, अशी घोषणा पटोले यांनी गुरुवारी केली.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : भाजपाला रामराम ठोकल्यानंतर माजी खासदार नाना पटोले यांनी भाजप नेत्यांवर हल्ले वाढविले आहेत. आता तर त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिले आहे. भंडारा-गोदिंया लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उमेदवार म्हणून उतरले किंवा भाजपाने राष्ट्रवादीचे नेते खा. प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी दिली तर त्यांच्या विरोधात आपण निवडणूक लढू, अशी घोषणा पटोले यांनी गुरुवारी केली.
नाना पटोले यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीवर टीका करीत गुजरात निवडणुकीची धामधूम सुरू असताना राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष खा. राहुल गांधी यांचीही भेट घेतली. तेव्हापासून पटोले हे भाजपावर अधिक आक्रमक झाले आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत पटोले यांनी भंडारा-गोंदिया मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता. आता पटोले यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या पदावर पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. यावर पटोले म्हणाले, मुख्यमंत्र्यांना दिल्लीचे बोलावणे येण्याची शक्यता आहे. तसे झाले तर ते भंडारा-गोंदियातून लोकसभेची पोटनिवडणूक लढू शकतात. प्रफुल्ल पटेल यांचीही भाजपाशी जवळीक वाढली आहे. ते ही भाजपाचे उमेदवार होऊ शकतात. या दोन नेत्यांपैकी एकानेही निवडणूक लढविली तर त्यांच्या विरोधात आपण रिंगणात उतरू, असे आव्हान त्यांनी दिले. ते लढले नाहीत तर काँग्रेसचा दुसरा कार्यकर्ता निवडणूक लढेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, कोरेगाव भीमा हिंसाचाराच्या पार्श्ववभूमीवर पटोले यांची १२ जानेवारीपासून सुरू होणारी प्रस्तावित पश्चात्ताप यात्रा व त्यांचा काँग्रेस प्रवेशही लांबणीवर पडला आहे. राज्यभर हिंसाचाराच्या घटना घडत असताना अशांत वातावरणात यात्रा काढणे योग्य होणार नाही, असे पटोले यांनी स्पष्ट केले. बुधवारी पटोले यांनी दिल्ली येथे खा. अशोक चव्हाण यांच्यासमवेत पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. या भेटीनंतरच पटोले यांच्या काँग्रेस प्रवेशाची घोषणा होणार होती. मात्र, राज्यात बंदचे वातावरण असताना राजकीय प्रवेशाची घोषणा करणे टाळण्यात आले.
दाभडीत ११ रोजी सभा
नाना पटोले यांच्या नेतृत्वात १२ जानेवारी रोजी राजमाता जिजाऊंचे जन्मस्थान असलेल्या सिंदखेड राजा (जि. बुलडाणा) येथून जयंतीनिमित्त सुरू होणारी ही पश्चात्ताप यात्रा शिवजयंतीला (१९ फेब्रुवारी) साकोली येथे पोहोचणार होती. ती आता पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र, ११ जानेवारी रोजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त यवतमाळ जिल्ह्यातील दाभडी येथे पश्चात्ताप यात्रा काढून जाहीर सभा घेणार असल्याचे पटोले यांनी स्पष्ट केले.