'मी नागपूरला ‘मिस’ करेन'; ‘एम्स’च्या पहिल्या संचालक मेजर जनरल डॉ. विभा दत्ता (निवृत्त) सेवानिवृत्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2023 08:00 AM2023-04-02T08:00:00+5:302023-04-02T08:00:12+5:30
Nagpur News अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) नागपूरच्या पहिल्या संचालक मेजर जनरल (निवृत्त) डॉ. विभा दत्ता यांचा कार्यकाळ सोमवारी पूर्ण होत आहे. सरकारने त्यांच्या जागेवर ‘एम्स’ मदुराईचे कार्यकारी संचालक डॉ. एम.एच. राव यांच्याकडे पदभार सोपविला आहे.
सुमेध वाघमारे
नागपूर : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) नागपूरच्या पहिल्या संचालक मेजर जनरल (निवृत्त) डॉ. विभा दत्ता यांचा कार्यकाळ सोमवारी पूर्ण होत आहे. सरकारने त्यांच्या जागेवर ‘एम्स’ मदुराईचे कार्यकारी संचालक डॉ. एम.एच. राव यांच्याकडे पदभार सोपविला आहे. नागपूर ‘एम्स’मध्ये ‘एमबीबीएस’ वर्ग सुरू करण्यापासून ते अतिविशेषोपचार विभाग सुरू करण्यापर्यंत डॉ. दत्ता यांनी दिलेले योगदान महत्त्वाचे आहे. ‘मी नागपूरला ‘मिस’ करेन असे त्यांचे भावोद्गार आहेत.
ऑक्टोबर २०१८मध्ये डॉ. विभा दत्ता यांच्याकडे ‘एम्स’च्या संचालकपदाची जबाबदारी आली. मिहान येथील १५० एकर परिसरात प्रस्तावित ‘एम्स’च्या बांधकामाला तेव्हा कुठे सुरुवात झाली होती. यामुळे डॉ. दत्ता यांनी मोठ्या प्रयत्नाने ‘एम्स’चा ‘एमबीबीएस’चे पहिले सत्र नागपूर मेडिकल कॉलेजमधून सुरू केले. त्यांनी ‘एम्स’च्या बांधकामाला प्राधान्य दिले. यामुळे वर्षभरातच म्हणजे २०१९ पासून मिहान ‘एम्स’मध्ये ‘एमबीबीएस’चे वर्ग सुरू करण्यात त्यांना यश आले. सप्टेंबर २०१९ पासून बाह्यरुग्ण विभागाला (ओपीडी) सुरुवात केली. फेब्रुवारी २०२०पासून आकस्मिक विभागासह वॉर्ड सुरू केले. मार्च २०२०पासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच त्यांनी नमुने तपासणीपासून ते रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था उभी केली. गोवा, गुजरातसह इतरही राज्यातील प्रयोगशाळांना कोरोना नमुने तपासणीचे प्रशिक्षण दिले. पुढे प्रगतीचा एक-एक टप्पा गाठत त्यांनी ‘एम्स’मध्ये ३८ विभाग सुरू केले. सध्या १८ वॉर्ड तर, २३ सुसज्ज असे शस्त्रक्रिया गृह आहेत. रोजची ओपीडीची संख्या वाढून दोन हजारांवर गेली आहे. अनेक महत्त्वाच्या शस्त्रक्रियांसह अवयव प्रत्यारोपणाला सुरुवात झाली आहे. २०२३मध्ये चार सुपर स्पेशालिटी अभ्यासक्रमात ‘डीएम’ व ‘एमसीएच’ अभ्यासक्रमाला सुरुवात करण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला आहे.
-पाच वर्षे आव्हाने आणि यशांनी भरलेली
‘लोकमत’शी बोलताना डॉ. विभा दत्ता म्हणाल्या, हा पाच वर्षांचा उत्तम कार्यकाळ होता. आव्हाने आणि यशांनी भरलेला होता. मला सर्व संबंधितांचे सहकार्य मिळाले, ज्याशिवाय एवढ्या कमी कालावधीत ‘एम्स’सारखी संस्था स्थापन करणे अशक्य होते. ‘एम्स’ही मध्य भारतातील आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आणि सर्वात मोठी संस्था म्हणून प्रसिद्धीस येईल, सोबतच नव्या भारतासाठी कौशल्यपूर्ण डॉक्टर निर्माण होतील, ही अपेक्षा आहे.