मुस्लीम बांधवांच्या खांद्याला खांदा लावून काम करेन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2022 09:21 PM2022-10-08T21:21:32+5:302022-10-08T21:22:03+5:30
Nagpur News सर्व समस्या सोडविण्यासाठी मी मुस्लीम समाजाच्या खांद्याला खांदा लावून काम करेन, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी शनिवारी येथे व्यक्त केला.
नागपूर : मुस्लीम समाज हा देशातील मोठा समुदाय आहे, परंतु त्यांना त्यांचे अधिकार मिळत नाही आहे. लोकसंख्येनुसार त्यांना त्यांचा हक्काचा वाटा मिळत नाही आहे. शिक्षण-रोजगारासह अनेक समस्या आहेत. या सर्व समस्या एक-दोन सत्रांनी सुटणार नाहीत. त्यावर सखोल चर्चा करावी लागेल. या सर्व समस्या सोडविण्यासाठी मी मुस्लीम समाजाच्या खांद्याला खांदा लावून काम करेन, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी शनिवारी येथे व्यक्त केला.
विदर्भ मुस्लीम इंटलेक्चुअल फोरमतर्फे हॉटेल तुली इंटरनॅशनल येथे ‘भारतीय मुस्लिमांचे प्रश्न’ या विषयावर संवादात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ.अजीज खान होते. ॲड.फिरदौस मिर्झा, आ.सुनील केदार, डॉ.आरिफ खान, राजा बेग, रमेश बंग आदी उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, कला, कविता, लेखन साहित्यासह विविध क्षेत्रांत मुस्लीम समाज आणि उर्दू भाषेचे मोठे योगदान राहिले आहे. मुस्लीम समाजाकडे क्षमता व गुणवत्ता आहे. त्यांना केवळ संधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. मुस्लीम समाजातील नवी पिढीही सर्वच क्षेत्रात आपले योगदान देत, समाज व राष्ट्रनिर्माणाचे कार्य करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मुस्लीम समाज सध्या ज्या समस्यांचा अनुभव घेत आहे, ती वस्तुस्थिती आहे. देशातील एक मोठा वर्ग असूनही त्यांना त्यांच्या लोकसंख्येनुसार वाटा मिळत नाही, ही गंभीर बाब आहे. बेरोजगारी व शिक्षण हा मुस्लीम समाजाचाच नाही, तर इतर समाजासाठीही महत्त्वाचा व गंभीर असा विषय आहे. मुस्लिमांना रोजगारातही योग्य वाटा मिळत नाही आहे. या सर्वांवर गांभीर्याने चर्चा होण्याची गरज आहे. यासाठी मी पुन्हा एकदा नागपुरात येईल. आपण सर्व जण यावर चर्चा करू व कोणती समस्या कशी सोडविता येईल, याचा मार्ग काढू, त्यासाठी मी तुमच्यासोबत काम करायला तयार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रास्ताविक डॉ.शकील सत्तार यांनी केले. संचालन परवेज सिद्दीकी यांनी केले.
अशा होत्या फोरमच्या मागण्या
- शासकीय भरती परीक्षेत उर्दू भाषेचा वापर व्हावा.
- अल्पसंख्याकांसाठी स्वतंत्र कार्यालय व्हावे.
- वक्फ बोर्डात अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी.
- उच्च शिक्षणात आरक्षण असावे.
- राजकीय प्रतिनिधित्व मिळावे.