काँग्रेसपेक्षा आंबेडकरांशी युती करायला आवडेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 12:52 AM2018-09-07T00:52:11+5:302018-09-07T00:52:57+5:30
आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये रिपाइंशी युती करण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष अनुकूल आहेत. परंतु आपल्याला अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी युती करायला अधिक आवडेल, असे सांगत रिपाइंचे महासचिव डॉ. राजेंद्र गवई यांनी गुरुवारी जाहीर पत्रपरिषदेद्वारे प्रकाश आंबेडकर यांच्यापुढे युतीचा प्रस्ताव ठेवला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये रिपाइंशी युती करण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष अनुकूल आहेत. परंतु आपल्याला अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी युती करायला अधिक आवडेल, असे सांगत रिपाइंचे महासचिव डॉ. राजेंद्र गवई यांनी गुरुवारी जाहीर पत्रपरिषदेद्वारे प्रकाश आंबेडकर यांच्यापुढे युतीचा प्रस्ताव ठेवला.
डॉ. गवई म्हणाले, २०१९ ची लोकसभा निवडणूक ही अतिशय महत्त्वाची राहणार आहे. आंबेडकरी समाजाची मते विभागली जाऊ नये, यासाठी महाराष्ट्रात रिपाइं-बसपा व भारिप बहुजन महासंघ यांची आघाडी व्हावी, अशी इच्छाही त्यांनी बोलून दाखवली. यासंदर्भात आपण स्वत: अॅड. प्रकाश आंबेडकर आणि मायावती यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अॅड. आंबेडकर यांनी बहुजन वंचित आघाडी स्थापन केली आहे. त्यांच्यासोबत एमआयएमचे खा. असदुद्दीन ओवेसी हे सुद्धा आहेत. तर काँग्रेस ओवेसी यांच्यासोबत राहणार नाही, असे त्यांच्या नेत्यांनीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे काँग्रेस व भारिपची युती होईल, असे वाटत नाही.
आगामी लोकसभा निवडणुुकीत आपण स्वत: अमरावती लोकसभा मतदार संघातून लढणार आहोत. आपली तयारी सुरू झाली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत युती झाली तर मिळून लढू, अन्यथा नाईलाजास्तव काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती करू. परंतु अमरावतीची जागा ही पक्षाच्याच एबी फॉर्मवर लढवली जाईल, असेही ते म्हणाले.
पत्रपरिषदेत प्रकाश कुंभे, प्राचार्य डी. दाभाडे, डी.एल.सोनपिंपळे, भीमराव वाहाणे, प्रा. बुद्धराज मून, सुहास भालेराव, एकनाथ ताकसांडे, विश्वनाथ खांडेकर आदी उपस्थित होते.
प्रामाणिक व्यक्तीला नक्षलवादी ठरवू नये
नक्षलवादी समर्थक म्हणून पोलिसांकडून सुरू असलेल्या अटकसत्राबाबत विचारले असता डॉ. राजेंद्र गवई म्हणाले, पोलिसांनी आपला तपास करावा. परंतु समाजात तेढ निर्माण करणे योग्य नाही. तपास योग्य व्हावा, कुठल्याही प्रामाणिक व्यक्तीला नक्षलवदी ठरवण्यात येऊ नये.