बेपत्ता पूजा खेडकरसाठी तपास यंत्रणांचे ‘ढुंढो ढुंढो रे...’; रसद शोधण्यासाठी अनेक शहरांवर नजर!

By नरेश डोंगरे | Published: August 3, 2024 11:15 PM2024-08-03T23:15:46+5:302024-08-03T23:16:14+5:30

तेल गमवाले.. तूप गमावले, मॅडमच्या नशिबी अज्ञातवास आले.

ias Pooja Khedkar case Investigation agency update | बेपत्ता पूजा खेडकरसाठी तपास यंत्रणांचे ‘ढुंढो ढुंढो रे...’; रसद शोधण्यासाठी अनेक शहरांवर नजर!

बेपत्ता पूजा खेडकरसाठी तपास यंत्रणांचे ‘ढुंढो ढुंढो रे...’; रसद शोधण्यासाठी अनेक शहरांवर नजर!

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : सनदी अधिकारी म्हणून अधिकृतरीत्या पदस्थ होण्यापूर्वीच चमकोगिरीच्या अट्टाहासापोटी नेम, फेम सारेच गमावून बसलेल्या आणि आता आरोपीच्या पिंजऱ्यात उभे होण्याची वेळ आलेल्या पूजा खेडकर यांना शोधून काढण्यासाठी ठिकठिकाणच्या तपास यंत्रणा कामी लागल्या आहेत.

त्यासाठी वाशिम-संभाजीनगर ‘मार्गावर’, संभाजीनगर ‘एअरपोर्टवर’ आणि आता अज्ञातस्थळी असताना पूजाला कुठून कुठून रसद पोहोचवली जात आहे, ते शोधून काढण्यासाठी तपास यंत्रणांनी अनेक शहरांवर नजर वळविली आहे.

पूजासह खेडकर कुटुंबीयातील फर्जिवाड्याचा बोभाटा झाल्यानंतर पूजाला तात्काळ मसुरीला पोहोचण्याचे आदेश मिळाले होते. त्यानंतर पूजा मसुरीला जाणार, असे सांगत वाशिममधून निघाली. त्यानंतर दोन-तीन तासात पूजा बेपत्ता झाली. ती दिल्लीला पोहोचली अन् तेथून दुबईला गेली असावी, असे बोलले जात असले तरी तपास यंत्रणांना गुंगारा देण्यासाठी तिने दुबईला जाण्याचा बनाव केला की काय, अशीही शंका शीर्षस्थ अधिकारी बोलून दाखवत आहेत. तिच्या वास्तव्याचे ’अज्ञातस्थळ’ शोधून काढण्यासाठी दिल्लीसह ठिकठिकाणच्या तपास यंत्रणा पूजासोबत कनेक्ट असलेल्यांवर नजर ठेवून आहेत. पूजा वाशिम येथून संभाजीनगरकडे निघाल्यानंतर रस्त्यात तिला दुसरीच एक गाडी उपलब्ध करून देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांना समजले आहे. या गाडीने ती संभाजीनगर एअरपोर्टवर पोहोचली. त्यानंतर ती दिल्लीला आल्याचा संशय आहे. तेथून गायब झाल्यानंतर मात्र पूजाचा ठावठिकाणा सापडेनासा झाला आहे. त्यामुळे तिला शोधण्यासाठी तपास यंत्रणा पूजाला रसद पोहोचवणाऱ्याचा शोध घेत आहेत. पूजाला आलिशान जगण्याची सवय असल्याने आणि सद्यस्थितीत रोख, कार्ड, फोन अथवा कोणत्याच दुसऱ्या साधनाने पूजा स्वत: बाहेरचा खर्च भागवू शकत नाही. अशात तिला जवळचेच कुुणी मॅनेज करून देत असावे, असा निष्कर्ष अधिकाऱ्यांनी काढला आहे. हे मदत करणारे कोण, त्याचाच शोध घेण्यासाठी दिल्लीसह महाराष्ट्रातील तपास यंत्रणा राज्यातील विविध शहराकडे डोळे लावून बसल्या आहेत.

पुण्यात फिर्यादी, नगरमध्ये गुन्हा नाही
विशेष म्हणजे, एकाचवेळी अनेक आरोपांच्या वावटळीत सापडलेल्या पूजा खेडकरविरुद्ध दिल्लीत गुन्हा दाखल असला तरी महाराष्ट्रात मात्र तिच्याविरुद्ध कुठेही गुन्हा दाखल नाही. पुण्यात पूजाविरुद्ध तक्रार नाही. तर, तिने जिल्हाधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार दिली आहे. त्या संबंधाने बयाण नोंदविण्यासाठी पुणे पोलिसांकडून तीन सूचनावजा नोटीस पाठविण्यात आल्या. मात्र, ती आली नाही. पुणे पोलिसांनी पूजाला व्हॉट्सॲपच्या माध्यमातूनही सूचना दिली. मात्र, त्या मेसेजलाही तिच्याकडून प्रतिसाद मिळाला नसल्याचे शीर्षस्थ सूत्रांनी लोकमतला सांगितले. दरम्यान, अहमदनगरच्या हॉस्पिटलमधून पूजाने बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून घेतल्याचा आरोप आहे. मात्र, तशा प्रकारचा आमच्याकडे अद्याप कसलाही गुन्हा दाखल नसल्याचे नगरच्या अधिकाऱ्यांनी लोकमतला सांगितले आहे.

Web Title: ias Pooja Khedkar case Investigation agency update

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.