‘आयएएस’साठी जिद्द हवी!
By admin | Published: November 1, 2015 03:17 AM2015-11-01T03:17:40+5:302015-11-01T03:17:40+5:30
नागरी सेवा करिअर करण्यासाठी उत्तम क्षेत्र आहे. परंतु त्यासाठी कठोर परिश्रमाची तयारी हवी असते. अनेकजण शॉर्टकट मार्गाने ‘आयएएस’ बनण्याचे स्वप्न पाहतात.
अनुप कुमार : ‘मी, आयएएस बोलतोय’ मार्गदर्शन शिबिर
नागपूर : नागरी सेवा करिअर करण्यासाठी उत्तम क्षेत्र आहे. परंतु त्यासाठी कठोर परिश्रमाची तयारी हवी असते. अनेकजण शॉर्टकट मार्गाने ‘आयएएस’ बनण्याचे स्वप्न पाहतात. मात्र ते स्वप्न कधीही पूर्ण होत नाही. ‘आयएएस’ बनण्यासाठी जिद्द व परिश्रमाची जोड हवी असते, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी केले.
संविधान फाऊंडेशन व प्रयाण ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने युपीएससी, एमपीएससी व सनदी अधिकारी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शनिवारी ‘मी, आयएएस बोलतोय’ या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सीताबर्डी येथील विदर्भ साहित्य संघाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी उद्घाटक म्हणून अनुपकुमार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संविधान फाऊंडेशनचे संस्थापक इ. झेड़ खोब्रागडे होते. अतिथी म्हणून सीबीआयचे उपमहानिरीक्षक संदीप तामगाडगे, संबोधी करिअर अॅकेडमीचे संचालक मंगेश बोरकर, अतिरिक्त आयुक्त (आयटी) क्रांती खोब्रागडे व स्वच्छंद चव्हाण उपस्थित होते. या कार्यक्रमाला स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. अनुपकुमार यांनी विद्यार्थ्यांसमोर स्वत:चे अनुभव सांगत, नागरी सेवा परीक्षेच्या तयारीसाठी महत्त्वाच्या टीप्स दिल्या. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना दोन ते तीन वर्ष कठोर परिश्रम करण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, या परीक्षेच्या तयारीसाठी जिद्द, प्रयत्न व ध्यास सर्वांत महत्त्वाचे आहे. तुमच्याकडे जिद्द असेल, तर तुम्हाला कुणीही रोखू शकणार नाही.
नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी रटेल ज्ञान उपयोगी ठरत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सखोल अभ्यास केला पाहिजे, असेही ते म्हणाले.
यावेळी संबोधी करिअर अॅकेडमीचे संचालक मंगेश बोरकर, संदीप तामगाडगे, इ. झेड़ खोब्रागडे व क्रांती खोब्रागडे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संचालन प्रियंका बागडे यांनी केले.(प्रतिनिधी)