नागपुरी संत्रा, माेसंबी निर्यातीचा मार्ग प्रशस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2021 01:11 PM2021-10-20T13:11:14+5:302021-10-20T13:16:11+5:30

अपेडा आणि भारतीय कृषी संशाेधन परिषद-केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशाेधन संस्था नागपूर यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यामुळे नागपुरी संत्रा व माेसंबीच्या दर्जेदार उत्पादनासाेबतच या दाेन्ही फळांच्या निर्यातीचा मार्ग आणखी प्रशस्त झाला आहे.

icar-ccri Nagpur signs MoU with APEDA Ministry of Commerce & Industry | नागपुरी संत्रा, माेसंबी निर्यातीचा मार्ग प्रशस्त

नागपुरी संत्रा, माेसंबी निर्यातीचा मार्ग प्रशस्त

googlenewsNext
ठळक मुद्देदिलीप घाेष : अपेडा व केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशाेधन केंद्र यांच्यात सामंजस्य करार

लाेकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : लिंबूवर्गीय फळांची निर्यात व त्यांचे मूल्यवर्धन करण्यासाठी अपेडा (कृषी व प्रक्रिया खाद्य उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण) आणि भारतीय कृषी संशाेधन परिषद-केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशाेधन संस्था नागपूर (आयसीएआर-सीसीआरआय) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यामुळे नागपुरी संत्रा व माेसंबीच्या दर्जेदार उत्पादनासाेबतच या दाेन्ही फळांच्या निर्यातीचा मार्ग आणखी प्रशस्त झाला आहे, अशी माहिती ‘आयसीएआर-सीसीआरआय’चे संचालक डाॅ. दिलीप घाेष यांनी दिली.

संत्रा व माेसंबीच्या दर्जेदार उत्पादन व निर्यातीसाठी लिंबूवर्गीय मूल्यवर्धन, तंत्रज्ञान विकास व प्रसाराची आवश्यकता आहे. निर्यात वाढविण्यासाठी संशाेधन व तंत्रज्ञान विकसित करावे लागणार आहे. या फळांच्या मूल्यवर्धित उत्पादनासाठी विशेष कार्यक्रम राबविला जाईल. त्यातून प्रशिक्षण दिले जाईल. निर्यातीसाठी फळांची मानक पद्धती (एसओपी) विकसित केली जाईल. फळ ताेडणीपूर्वी व ताेडणीनंतरचे व्यवस्थापन, विषाक्त अवशेष नियंत्रण, ताेडणीनंतरचे अंतर, फळ टिकण्याचा काळ या बाबींवर प्राधान्याने काम केले जाणार आहे, असेही डाॅ. दिलीप घाेष यांनी सांगितले.

संत्रा उत्पादक जिल्ह्यांमध्ये सक्रिय शेतकरी उत्पादक संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या व स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने स्थानिक पातळीवर निर्यातीभिमुख विस्तार कार्यक्रम राबविला जाईल. यातून टिकाऊ मूल्य साखळी तयार केली जाईल. चांगल्या मालवाहतुकीला तसेच सेंद्रिय संत्रा व माेसंबी उत्पादनाला प्राेत्साहन दिले जाईल. कीड व राेग नियंत्रणासाठी विशेष कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचेही ‘आयसीएआर-सीसीआरआय’चे संचालक डाॅ. दिलीप घाेष यांनी सांगितले.

करारातील उद्दिष्टे

या दाेन्ही संस्थांच्या संयुक्त सहभागाने नागपुरी संत्रा व माेसंबी जागतिक बाजाराशी जाेडली जाईल. त्यातून निर्यात बास्केट, वाहतूक व दर्जेदार उत्पादनास मदत हाेईल. जागतिक पातळीवर ‘ब्रँड इंडिया’ स्थापन करून उच्च दर्जाच्या संत्रा व माेसंबीचे उत्पादन करून निर्यात वाढविण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. संत्रा व माेसंबीच्या बाजाराचा विकास, स्थानिक वैशिष्ट्यपूर्णता, ब्रँडिंग, पॅकिंग, बाजार व व्यापार काैशल्य, दर्जेदार उत्पादन, व्यापार व निर्यातीला प्राेत्साहन देण्यासाठी शेतकरी, उद्याेजक, निर्यातदार व इतर भागधारकांचे काैशल्य व क्षमता वाढविणे, शेतकरी उत्पादन कंपन्यांना (एफपीसी) प्राेत्साहन देणे, त्यांना जागतिक बाजाराशी जाेडणे, तंत्रज्ञान विकसित करणे, हस्तांतरण व तांत्रिक काैशल्य वाढविणे, प्रयाेगशाळांचे बळकटीकरण करणे, आयात करणाऱ्या देशांच्या गरजेनुसार चाचण्यांची साेय करून त्यावर विशेष भर दिला जाईल, असेही डाॅ. दिलीप घाेष यांनी सांगितले.

Web Title: icar-ccri Nagpur signs MoU with APEDA Ministry of Commerce & Industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती