गारेगार बर्फाचा गोळा आरोग्याला हानीकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 10:55 PM2018-04-11T22:55:45+5:302018-04-11T22:55:55+5:30
उन्हाळा आला की थंडपेय पदार्थाच्या विक्रीची दुकाने सजू लागतात. मात्र, शीतपेये अथवा बर्फाचा गोळा घेताना त्यात वापरल्या जाणाऱ्या बर्फाच्या गुणवत्तेबाबत शंका कुणालाच येत नाही. उन्हाची उष्णता शमविण्यासाठी बर्फ गोळा विकणाऱ्या गाड्यांजवळ लहान मोठ्यांची गर्दी पाहायला मिळते. परंतु बर्फ गोळा खाणे वैद्यकीयदृष्ट्या शरीरास हानीकारक आहे. बऱ्याच बर्फ कारखान्यात दूषित पाण्यापासून बर्फ तयार करण्यात येतो. अशा कारखान्यांची अन्न व औषध प्रशासन विभागाने वारंवार तपासणी करावी, अशी मागणी पुढे आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उन्हाळा आला की थंडपेय पदार्थाच्या विक्रीची दुकाने सजू लागतात. मात्र, शीतपेये अथवा बर्फाचा गोळा घेताना त्यात वापरल्या जाणाऱ्या बर्फाच्या गुणवत्तेबाबत शंका कुणालाच येत नाही. उन्हाची उष्णता शमविण्यासाठी बर्फ गोळा विकणाऱ्या गाड्यांजवळ लहान मोठ्यांची गर्दी पाहायला मिळते. परंतु बर्फ गोळा खाणे वैद्यकीयदृष्ट्या शरीरास हानीकारक आहे. बऱ्याच बर्फ कारखान्यात दूषित पाण्यापासून बर्फ तयार करण्यात येतो. अशा कारखान्यांची अन्न व औषध प्रशासन विभागाने वारंवार तपासणी करावी, अशी मागणी पुढे आली आहे.
रासायनिक रंगाचा वापर
रासायनिक रंग, निकृष्ट दर्जाचे पाणी आणि सॅकरीनपासून गोळा व आईस कॅन्डी तयार केली जाते. वाढत्या महागाईमुळे यात मिसळणारे उच्च प्रतीचे रंग, साखर बर्फ गोळा विकणाऱ्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. चांगल्या प्रतीचे उत्पादन तयार करताना उत्पादनाचा खर्च वाढतो. त्यामुळेच निम्न दर्जाचा रंग आणि सॅकरीनचा विक्रेते उपयोग करतात. बर्फ गोळ्याच्या स्वरुपात आजार विकत आहोत, याची कल्पना विक्रेत्यांना असते. पण कारवाईअभावी हे व्यवसाय धडाक्यात सुरू आहेत.
विक्रेत्यांच्या ठेल्यावर अस्वच्छता
बर्फ गोळे विक्रेत्यांच्या ठेल्यावर नेहमीच अस्वच्छता असते. त्यातच गोळा तयार करताना बर्फ लोखंडाच्या ब्लेडमधून किसला जातो. या ठेल्यावर बऱ्याचदा रासायनिक रंगाच्या बाटल्या उघड्यावर ठेवलेल्या असतात. शिवाय बर्फाचे गोळे रस्त्यावर विकण्यात येत असल्यामुळे आपल्याला न दिसणारे धूळीचे कण त्यात मोठ्या प्रमाणात मिसळलेले असतात. त्यानंतर लहानांपासून वयस्क बर्फाचे गोळे खातात आणि पोटाचे आजार ओढवून घेतात.
वापरलेल्या बर्फाचा तहान भागविण्यासाठी उपयोग
बर्फाचा मूळ वापर रुग्णालयांमध्ये औषधांचा अथवा सलाईनचा साठा करण्यासाठी होतो. मच्छिमार याचा वापर मासे ताजे राहण्यासाठी करतात. बर्फाचा सर्वाधिक वापर हा रासायनिक उत्पादने तयार करणाºया कंपन्यांमध्ये होतो. विक्रेते वापरलेल्या बर्फाची विक्री करतात. ते शरीरासाठी हानीकारक असते. याशिवाय कारखान्यातही बर्फ मोठ्या आकाराचा व्हावा व तो जास्त काळ टिकावा, यासाठी त्यावर मोठ्या प्रमाणावर रासायनिक प्रक्रिया केली जाते. हे सुद्धा आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे. त्यामुळे बर्फ तयार करण्यासाठी कोणत्या प्रकारचे पाणी वापरले जाते, याचा उल्लेख कारखान्यात दर्शनी भागात करणे बंधनकारक आहे.
परवाना बंधनकारक
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नियमानुसार खाद्य बर्फ विक्रेत्यांनी परवाना घेणे बंधनकारक आहे. जे उत्पादक विनापरवाना व्यवसाय करतील, त्यांच्यावर कलम ६३ नुसार सहा महिन्यांपर्यंत शिक्षा व पाच लाख रुपये दंडाची तरतूद आहे. एखाद्या बर्फाच्या उत्पादकाने त्यामध्ये निळा रंग न वापरल्यास अन्नसुरक्षेच्या नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे. दूषित बर्फामध्ये इ-कोलाय या शरीराला घातक असलेल्या विषाणूचे प्रमाण किती आहे, या दृष्टीने विभागातर्फे हॉटेल, रेस्टॉरंट, ज्यूस सेंटर, बर्फाचे गोळे तयार करून विकणाऱ्या विक्रेत्यांची अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे तपासणी करण्यात येणार आहे.
अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांचे निर्देश
खाण्यात वापरण्यात येणारा बर्फ शरीरासाठी अपायकारक असल्याने आरोग्याला धोका संभवू शकतो. ही गोष्ट लक्षात घेऊन अयोग्य बर्फ ओळखण्यासाठी बर्फात निळसर रंग टाकावा, असे आदेश देण्यात आले आहेत. याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी दिले आहेत.
बर्फ उत्पादकांची बैठक
बर्फ उत्पादकांची मंगळवारी कार्यालयात बैठक घेतली. त्यात १६ उत्पादक उपस्थित होते. शासनाच्या अध्यादेशानुसार खाण्यायोग्य बर्फ पांढऱ्या रंगाचा आणि खाण्यायोग्य नसलेला बर्फ निळसर रंगाचा तयार करण्याचा सूचना उत्पादनांना देण्यात आल्या. खाण्यासाठी आणि उद्योगासाठी पांढरा बर्फ पिण्याच्या पाण्यापासून तयार करावा. सोबत उत्पादकांनी पाण्याचा अहवाल ठेवावा, अशा सूचना देण्यात आल्या. अध्यादेशाची अंमलबजावणी आणि मशीनरीमध्ये बदल करण्यासाठी उत्पादकांनी आठ दिवसाचा वेळ मागितला आहे. त्यानंतर कारखान्यांची तपासणी करणार आहे.
शशीकांत केकरे, सहआयुक्त (अन्न)
अन्न व औषध प्रशासन विभाग.
अशुद्ध बर्फ शरीरासाठी घातकच
अशुद्ध पाण्यापासून तयार केलेला बर्फ आजाराला आमंत्रण देणारा आहे. त्यामुळे पोटाचे विकार, कावीळ, डायरिया आणि संसर्ग होण्याची शक्यता असते. हे आजार गंभीर आहेत. या रुग्णांचे प्रमाण उन्हाळ्यात अशुद्ध बर्फाचे सेवन केल्यामुळे वाढते. लग्नात बर्फ टाकलेले पाणी पिऊ नये. घरी येऊन पाणी प्यावे. रस्त्यावर बर्फमिश्रित रस आणि अन्य पदार्थ खाऊ नये. संबंधित विभागाने बर्फ उत्पादकांची वारंवार तपासणी करावी.
डॉ. सुधीर गुप्ता, गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट.