अंबाझरी तलाव परिसरातून काढला तब्बल १५ बॅग कचरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2021 02:21 PM2021-12-27T14:21:44+5:302021-12-27T14:23:50+5:30
रविवारच्या अभियानात आय-क्लिन नागपूरच्या कार्यकर्त्यांनी अंबाझरी तलाव परिसरातून तब्बल १५ बॅग कचरा काढला. यात खर्रा, गुटख्याचे पाऊच, प्लास्टिक बाॅटल, चाॅकलेटचे रॅपर व स्नॅक्स बॅग्जचा कचरा अधिक प्रमाणात होता.
नागपूर : आय-क्लिन नागपूरच्या टीमने रविवारी अंबाझरी तलाव परिसरात स्वच्छता अभियान राबविले. यावेळी कार्यकर्त्यांनी तलाव परिसरातून तब्बल १५ बॅग भरून कचरा काढला. यामध्ये खर्रा, गुटख्याचे पाऊच, प्लास्टिक बाॅटल, चाॅकलेटचे रॅपर व स्नॅक्स बॅग्जचा कचरा अधिक असल्याचे दिसून आले.
आय-क्लिन नागपूरची टीम गेल्या पाच-सहा वर्षांपासून शहरात ठिकठिकाणी स्वच्छता अभियान व सुशाेभीकरणाचे काम करीत आहे. आतापर्यंत २०० हून अधिक ठिकाणची स्वच्छता आणि सुशाेभीकरण या टीमने केले. मागील दाेन वर्षांपासून काेराेनामुळे त्यांचे अभियान थांबले हाेते. यानंतर पुन्हा टीमने स्वच्छतेचा जागर सुरू केला आहे. याची सुरुवात अंबाझरी तलावापासून करण्यात आली. १० ते ६५ वर्ष वयाेगटातील तरुण, विद्यार्थी, नाेकरीपेशा, निवृत्त कार्यकर्ते रविवारी अंबाझरी तलावावर पाेहोचले व त्यांनी स्वच्छता अभियान सुरू केले. यावेळी दरराेज येथे फिरणारा माॅर्निंग वाॅकर्सनीही स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला. त्यांनी तलावकाठाच्या परिसरातून कचरा गाेळा करण्यास सुरुवात केली.
तलाव परिसरात माेठ्या प्रमाणात खर्रा आणि गुटख्याचा प्लास्टिक कचरा पसरला हाेता. शिवाय प्लास्टिकच्या बाॅटल्सही तलावात तरंगत असल्याचे दिसले. येथे फिरायला येणाऱ्यांकडून स्नॅक्सचा कचराही तलावात फेकला जाताे, हेही लक्षात आले. हा कचरा तलावाच्या आराेग्याच्या दृष्टीने अतिशय धाेकादायक प्रकार आहे. नागरिकांनी साैजन्य राखून कचरा तलावात फेकू नये, असे आवाहन आय-क्लिनचे संदीप अग्रवाल यांनी केले. दरम्यान रविवारच्या अभियानात कार्यकर्त्यांनी १५ बॅग कचरा तलाव परिसरातून काढला आणि महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या हवाली केला.