आयसीयूचे बांधकाम संथगतीने
By admin | Published: November 2, 2016 02:30 AM2016-11-02T02:30:36+5:302016-11-02T02:30:36+5:30
मेडिकलमध्ये २०११ मध्ये तीन कोटी रुपये खर्चून तीन विविध विभागाचे प्रत्येकी एक अतिदक्षता विभाग (आयसीयू) होणार होते.
मेडिकल : २५०८ चौरस मीटर जागेवर होत आहे बांधकाम
नागपूर : मेडिकलमध्ये २०११ मध्ये तीन कोटी रुपये खर्चून तीन विविध विभागाचे प्रत्येकी एक अतिदक्षता विभाग (आयसीयू) होणार होते. परंतु बांधकामाच्या जागेला घेऊन तत्काळ निर्णय होऊ न शकल्याने तब्बल तीन वर्षे बांधकाम रखडले. डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्याकडे अधिष्ठातापदाची सूत्रे येताच त्यांनी या विभागाचे बांधकाम हाती घेतले. जागेचे क्षेत्रफळ वाढवून सुधारित १२ कोटींच्या प्रस्तावाला मंजुरीही मिळाली. २८ मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बांधकामाचे भूमिपूजनही झाले. परंतु पाच महिन्याचा कालावधी होत असताना बांधकामाला अद्यापही वेग आला नाही.
मध्य भारतातील सर्वात मोठे रुग्णालय असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) केवळ औषध वैद्यकशास्त्र विभागाचे आयसीयू आहे. मात्र, इतर विभागातील गंभीर रुग्णही येथेच ठेवले जात असल्याने हा विभाग नेहमीच फुल्ल असतो. अनेक वेळा बाहेरून येणाऱ्या गंभीर रुग्णांना खाटा नसल्याचे कारण सांगून खासगी रुग्णालयात पाठविण्याचे प्रकारही झाले. याची दखल घेत मेडिकल प्रशासनाने २०११ मध्ये पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजनेंतर्गत १५० कोटींच्या योजनेत ‘सर्जिकल इन्टेन्सिव्ह केअर युनिट’, ‘मेडिसीन इन्टेन्सिव्ह केअर युनिट’ आणि ‘नवजात शिशू इन्टेन्सिव्ह केअर युनिट’साठी ‘आयसीयू’च्या बांधकामाचा प्रस्ताव तयार केला. त्यावेळी हा प्रस्ताव १६९० चौरस मीटर जागेवर होणार होता. अपेक्षित खर्च ३ कोटी ४२ लाख २१ हजार रुपयांचा होता. विशेष म्हणजे, याला प्रशासकीय मंजुरी मिळाली होती.
परंतु मेडिकलच्या २०० एकरच्या परिसरात या बांधकामासाठी जागा पाहायला तब्बल तीन वर्षे गेली. अखेर वॉर्ड क्र. ५ च्या मागील परिसरातील मोकळ्या जागेला बांधकाम विभागाने मंजुरी दिली. दरम्यान, डॉ. निसवाडे यांच्याकडे अधिष्ठातापदाची जबाबदारी येताच त्यांनी २५०८ चौरस मीटरपर्यंत बांधकामाचे क्षेत्र वाढविले. १२ कोटी ६ लाख ४३ हजार रुपयांचा हा सुधारित प्रस्ताव डीएमईआरकडे पाठविला.
हिवाळी अधिवेशनातही या प्रस्तावावर चर्चा झाली. अखेर याला मंजुरी मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मे महिन्यात भूमिपूजन झाले. बांधकाम विभागाकडे निधी उपलब्ध असताना बांधकामाला अद्यापही गती आली नाही. यामुळे मुदतीत हे काम पूर्ण न होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. असे झाल्यास गंभीर रुग्णांना आणखी काही काळ अद्ययावत उपचारापासून वंचित राहावे लागणार आहे. (प्रतिनिधी)