ईद ए मिलाद; प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांचे व्यक्तिमत्त्व समजून घेऊ या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 05:15 PM2018-11-21T17:15:39+5:302018-11-21T18:08:46+5:30
हजरत मुहम्मद पैगंबर यांचा आज जन्मदिन. त्यांनी समतेचा व्यवहारिक संदेश दिलाच नाही तर केवळ २३ वर्षाच्या कालावधीत या समतेवर आधारित समाज स्थापन करून जगाला दाखविला.
आमीन चौहान
नागपूर:
हजरत मुहम्मद पैगंबर यांचा आज जन्मदिन. त्यांनी समतेचा व्यवहारिक संदेश दिलाच नाही तर केवळ २३ वर्षाच्या कालावधीत या समतेवर आधारित समाज स्थापन करून जगाला दाखविला. राजाराम मोहन रॉय, महात्मा ज्योतिबा फुले, स्वामी विवेकानंद आणि बाबासाहेब आंबेडकर हे प्रेषित मुहम्मदांचा उल्लेख वारंवार समतेचा प्रणेता म्हणून करतात. त्याकाळी अरब समाजात काळ्या गुलामांची खरेदी-विक्री केली जायची. प्रेषितांनी जैद नावाच्या काळ्या गुलामाला आपली आत्तेबहिण देऊन काळ्या-गोऱ्याचा भेद नष्ट केला. जैद हरिसा नावाच्या गुलामाच्या घटस्फोटितेशी विवाह करून त्यांनी तिला प्रेषितांची पत्नी बनण्याचा बहुमान त्या काळी दिला.
एका ठिकाणी स्वामी विवेकानंद म्हणतात, अन्य धर्मियांच्या तुलनेत मुसलमान लोक कितीतरी श्रेष्ठ ठरतात. जातीचा आणि वर्णाचा विचार न करता, सर्वांप्रती समभाव बाळगणे हे मुसलमानांचे उज्ज्वल वैशिष्ट्य आहे.
पैगंबरांचे स्त्रियांसाठी योगदान
ज्याकाळी जगातील श्रेष्ठ तत्वज्ञान स्त्रीमध्ये आत्मा असतो कि नाही यासारख्या गप्पा मारण्यात व्यस्त होते त्या काळात प्रेषित मुहम्मदांनी स्त्रीला सर्वच क्षेत्रात समान (एकसारखे नव्हे) अधिकार देऊन टाकले. प्रसिद्ध मार्क्सवादी भारतीय विचारवंत एम. एन. रॉय आपल्या इस्लामचे ऐतिहासिक योगदान या पुस्तकात स्त्रीला माणूस म्हणून दर्जा देणारा धर्म इस्लाम असल्याचा उल्लेख करून प्रेषितांच्या कार्याचा गौरव केला आहे. अरब समाजाच्या नसानसात भिनलेल्या, जन्मलेल्या मुलीला जिवंत पुरायच्या प्रथेला केवळ १३ वर्षाच्या कालखंडात प्रेषितांनी अशाप्रकारे हद्दपार करून दाखविले की मागील १४०० वर्षाच्या इतिहासात एकाही मुलीला केवळ मुलगी असल्यामुळे मारण्यात आलेले नाही. सच्चर समितीच्या रिपोर्टनुसार भारतीय मुस्लीम समाजात मुलींचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त आहे.
पैगंबरांचे आर्थिक योगदान
व्याजाच्या शापाने ग्रस्त झालेल्या समाजाला प्रेषितांनी सावकारी पाशातून मुक्त करून व्याजमुक्त अर्थव्यवस्थेचा संदेश दिला आणि केवळ १० वर्षाच्या कालखंडात व्याजमुक्त अर्थव्यवस्था प्रस्थापित करून दाखविली. अरब समाजात लोक सावकारी एक भयंकर पाप समजू लागले. केवळ व्याजाच्या नावाने सावकार थरथर कापू लागले. आपल्याकडे अधिक असलेली रक्कम लोक स्वत: दान करू लागले. पैसे उधार देऊन सोडून देऊ लागले. गरिबांना आणि गरजूंना मागण्याची परिस्थितीच कधी प्रेषितांनी येऊ दिली नाही.
पैगंबरांचे राजकीय योगदान
ज्या काळात राजेशाहीच एकमात्र राजकीय व्यवस्था होती त्या काळात प्रेषितांनी लोकशाहीची बीजे रोवली. मृत्यूशय्येवर असताना प्रेषितांनी आपल्यानंतर मुस्लीम समाजाचे नेतृत्व कोण करणार याची जबाबदारी मुस्लीम समाज प्रतिनिधींकडे सोपविली. आपल्यानंतर एखाद्या नातेवाईकाला जबाबदारी सोपवून घराणेशाही सुरु करण्याची संधी असूनही त्यांनी ही प्रथा लाथाडली आणि इस्लाममध्ये घराणेशाहीची दारे कायमची बंद करून टाकली. मुस्लीम समाजाने प्रेषितांनंतर शेकडो वर्षे प्रेषितांनी दाखविलेला लोकशाही मार्ग अवलंबून दाखविला. हजारो वषार्पासून टोळीपद्धतीने राहणाºया भटक्या अरब समाजाला एकसूत्र करून दाखविण्याचे श्रेय केवळ प्रेषितांचे.
पैगंबरांचे शैक्षणिक योगदान
प्रत्येक मुस्लीमासाठी मग ती स्त्री असो कि पुरुष, शिक्षण प्राप्त करणे अनिवार्य असल्याचा आदेश प्रेषितांनी दिला. आपल्या अनुयायांवर शिक्षणाची सक्ती करून शिक्षणाला प्रभुत्वाचे माध्यम असल्याचा दर्जा दिला. युद्धामध्ये पकडल्या गेलेल्या युद्ध कैद्यांना ठार करण्याची प्रथा प्रचलित असताना प्रेषितांनी हा पायंडा मोडून काढला आणि एक नवा पायंडा सुरु केला. युद्धामध्ये पकडला गेलेला कैदी जर मुस्लिमांना लिहिण्या-वाचण्याचे कौशल्य शिकवू शकत असेल तर तो मुक्त केला जाई. याप्रकारे प्रेषितांनी मुस्लीम समाजाला प्रत्येक क्षेत्रात केवळ १० वर्षाच्या कालखंडात अग्रेसर करून ठेवले. रानटी आणि भटक्या लोकांचा अरब समाज, प्रेषितांच्या या जगातून निरोपाच्या वेळेस एक महान संस्कृती म्हणून उदयास आला होता. एका नव्या संस्कृतीचा, इस्लामी संस्कृतीचा जन्म झाला होता.
अशाप्रकारे प्रेषित मुहम्मद जगातील इतिहासात सर्वाधिक प्रभावशाली व्यक्तिमत्व सिद्ध होतात.