प्रत्येक कलावंतांचा विचार ‘स्वप्नांना पंख नवे’

By admin | Published: November 30, 2014 12:58 AM2014-11-30T00:58:09+5:302014-11-30T00:58:09+5:30

स्टार प्रवाह वाहिनीने आता कात टाकली आहे. स्टार प्रवाह सध्या ‘स्वप्नांना पंख नवे’ या नव्या संकल्पनेवर अग्रेसर आहे. या संकल्पनेवरच वाहिनीच्या मालिकांचे सादरीकरण करण्याचा प्रयत्न असून

The idea of ​​every artist is to "dream new to dreams" | प्रत्येक कलावंतांचा विचार ‘स्वप्नांना पंख नवे’

प्रत्येक कलावंतांचा विचार ‘स्वप्नांना पंख नवे’

Next

महिला सशक्तीकरणाचा विचार मांडण्याचा प्रत्येक मालिकांचा प्रयत्न
नागपूर : स्टार प्रवाह वाहिनीने आता कात टाकली आहे. स्टार प्रवाह सध्या ‘स्वप्नांना पंख नवे’ या नव्या संकल्पनेवर अग्रेसर आहे. या संकल्पनेवरच वाहिनीच्या मालिकांचे सादरीकरण करण्याचा प्रयत्न असून ही संकल्पना यशस्वी करण्यासाठी स्टार प्रवाह महिला सशक्तीकरणावर भर देत आहे. त्यामुळे वाहिनीवरील प्राईम टाइममधील मालिकांत महिला पत्रकार, पोलीस, अ‍ॅडव्होकेट, सून आदी पात्रांवर आधारित आहेत. लोकमत समूहाच्यावतीने आयोजित धमाल दांडिया स्पर्धेत परीक्षकांच्या भूमिकेत राहण्यासाठी आलेल्या स्टार प्रवाहच्या कलावंतांनी याप्रसंगी लोकमतशी खास संवाद साधला. यात दिग्दर्शक महेश कोठारे, अभिनेत्री सुरेखा कुडची, श्वेता शिंदे, जुई गडकरी यांचा सहभाग होता.
जयेश पाटील
स्टार प्रवाहचे प्रोग्रामिंग हेड जयेश पाटील यावेळी म्हणाले, स्टार प्रवाहची टॅगलाईनच ‘स्वप्नांना पंख नवे’ अशी आहे. या टॅगशी वाहिनीवरील सर्व मालिकांना जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे. स्टार प्रवाहच्या प्रारंभापासून वाहिनी काहीतरी वेगळे करण्यास इच्छूक होती. यात मराठी कथाबीज आणि दर्जा राखणे हे आव्हान होते. आमच्या चमूने काम सुरू केले आणि त्यावर एकापेक्षा एक कल्पना मिळाल्यात. वाहिनीवरील ‘जयोस्तुते’ असो वा ‘लक्ष्य’ ही मालिका, यात प्रमुख भूमिकेत महिला असणार आहे. प्रत्येक मालिका सत्य घटनांवर आधारित आहे. यात विदर्भातील कथांनाही मालिकेत स्थान देण्याचा प्रामुख्याने प्रयत्न करण्यात आला आहे. गुन्हे प्रकरणाशी संबंधित मालिकेत आम्ही अक्कू यादव प्रकरणाचाही अभ्यास करीत आहोत, असे ते म्हणाले.
महेश कोठारे
‘जयोस्तुते’ मालिकेचे निर्माता महेश कोठारे यांची ओळख देण्याची रसिकांना गरज नाही. जयोस्तुते मालिका एका महिला वकिलावर आधारित आहे. ही महिला केवळ एक रुपयात न्यायालयात अन्यायाविरुद्ध लढते. गरीब आणि प्रामाणिक अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्याची तिची भूमिका आहे. मला ही संकल्पनाच खूप आवडली. महागाईच्या दिवसात वकिलाचे शुल्क न देऊ शकणाऱ्या गरिबांना न्याय कसा मिळत असेल, हा प्रश्नही मनात आला. बस...या संकल्पनेवर मालिका मनात आली आणि मी जयेश पाटील यांना भेटलो. त्यांनाही ही संकल्पना खूप आवडली आणि आम्ही काम सुरू केले. सध्या ही मालिका चांगलीच लोकप्रिय होते आहे, असे महेश कोठारे यांनी सांगितले.
श्वेता शिंदे
चित्रपट अभिनेत्री श्वेता शिंदे स्टार प्रवाहवरील ‘लक्ष्य’ मालिकेत भूमिका करीत आहे. ११ डिसेंबरपासून श्वेता यात इन्स्पेक्टर रेणुका राठोडच्या भूमिकेत दिसणार आहे. तब्बल चार वर्षानंतर श्वेता या भूमिकेत रसिकांना दिसणार आहे. त्यांच्या कन्येचा जन्म झाल्याने त्यांनी काही काळ अवकाश घेतला होता. श्वेता म्हणते, या मालिकेत तिचा नागपूरशी संबंध दाखविण्यात आला आहे. त्यामुळेच या मालिकेत अनेक नागपुरी शब्दांचा प्रयोग करण्यात आला आहे. ‘बे’ हा शब्द उच्चारताना बरेच प्रयोग केल्याचेही तिने गमतीने सांगितले. मालिकेतील अनेक स्टंट आपण स्वत: केले असून या क्षेत्रात पुन्हा प्रवेश करताना समाधान वाटते, असे ती म्हणाली.
जुई गडकरी
‘पुढचे पाऊल’ मालिकेत जुई गडकरी हिने कल्याणीची भूमिका साकारली आहे. एका सामान्य सुनेची ही भूमिका आहे. या सुनेची काहीही स्वप्ने नसतात. पण सासूच्या सहकार्याने ती प्रगती करते. सध्या ती फॅशन डिझाईनर झाली आहे. जुई म्हणते, माझ्या अस्सल जीवनापेक्षा ही भूमिका खूपच वेगळी आहे. चित्रीकरणाच्यावेळी तर आम्ही खूप मजा करतो. जुईने एमबीए केले असून ती सहायक संचालक म्हणून नोकरीही करीत होती. पण तिला या मालिकेची संधी आल्यावर ती मालिकेत आली.
सुरेखा कुडची
रुंजी मालिकेतील सुरेखा कुडची सासूची भूमिका वठवित आहे. मीनाक्षी पिटकर नावाच्या या भूमिकेत ती सुनेप्रति अत्यंत नकारात्मक असल्याचे दाखविण्यात आले आहे. सुरेखा म्हणाल्या, खऱ्या आयुष्यात मात्र मी खूप वेगळी आहे. माझ्या मुलाच्या प्रवेशासाठी मी शाळेत गेले तेव्हा शिक्षिकेने मला ओळखले. ती म्हणाली, तुम्ही रुंजीतल्या मीनाक्षी आहात ना..मी तिला हो म्हटले. तेव्हा तिने मात्र मला तुम्ही फार वाईट आहात, असे सांगितले. हे ऐकल्यावर मला हसायलाच आले. पण आपल्या भूमिकेने कुणाला तसे वाटत असेल तर ते त्या भूमिकेचे यश असते. यापुढे मी सकारात्मक भूमिका करणार आहे. पण मला बहुतेक भूमिका नकारात्मक मिळतात. या नकारात्मक भूमिकांनीही माझी स्वतंत्र ओळख निर्माण केली, यात वाद नाही, असे त्या म्हणाल्या.

Web Title: The idea of ​​every artist is to "dream new to dreams"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.