मुख्यमंत्र्यांचे फेटरी ठरले आदर्श मॉडेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2017 02:13 AM2017-08-06T02:13:42+5:302017-08-06T02:15:28+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदर्श ग्राम म्हणून फेटरी या गावात राबविलेल्या पिण्याच्या पाण्यासह सर्वांगीण ग्राम विकासाच्या योजनांची अंमलबजावणी केली आहे.

Ideal model of Chief Minister's Fatere | मुख्यमंत्र्यांचे फेटरी ठरले आदर्श मॉडेल

मुख्यमंत्र्यांचे फेटरी ठरले आदर्श मॉडेल

Next
ठळक मुद्देगावाच्या विकासाला नवी दिशा : ४ कोटी ७० लाखांची विकास कामे पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदर्श ग्राम म्हणून फेटरी या गावात राबविलेल्या पिण्याच्या पाण्यासह सर्वांगीण ग्राम विकासाच्या योजनांची अंमलबजावणी केली आहे. विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदेच्या शाळेत सुरू केलेल्या डिजिटल क्लासरूमसह डिजिटल अंगणवाडी या योजनेचा आदर्श गावाच्या विकासाला नवी दिशा देणारा ठरत आहे.
ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाचे मॉडेल ठरावे आणि या विकासाच्या मॉडेलची प्रेरणा इतर गावांनी घ्यावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आमदार आदर्श गाव ही संकल्पना राज्यात सुरू केली. नागपूरजवळच्या फेटरी गावाची निवड करून येथे मूलभूत सुविधांच्या विकासासोबतच ग्रामीण जनतेच्या जीवनात परिवर्तन व्हावे यासाठी विविध विभागांच्या योजना एकत्र राबविल्यामुळे फेटरी गावात पिण्याच्या पाण्यासह आरोग्य, शिक्षण, सामाजिक व आर्थिक विकास, पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी सुविधा, दलित वस्ती विकास, बेघरांना घरकूल तसेच निर्मल ग्रामची संकल्पना एकत्र राबविण्यात आली.
आदर्श ठरलेल्या फेटरी या गावात अत्यंत जुन्या असलेल्या पाणीपुरवठा योजनेमुळे निर्माण होणाºया पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत एक कोटी रुपयांच्या निधीतून संपूर्ण गावात पाणीपुरवठा होईल व त्यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. पिण्याच्या पाण्याच्या योजनेला अखंडित वीजपुरवठा व्हावा यासाठी सात कोटी रुपये खर्च करून ३३ केव्ही सबस्टेशनचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. त्यासोबतच रस्त्यांच्या कामाला प्राधान्य देऊन सिमेंट रस्त्यांची कामे तसेच जलयुक्त शिवारच्या माध्यमातून सिमेंट बंधारे व नाल्यातील गाळ काढण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला आहे.
शेतीला सिंचनाचे पाणी तर ग्रामस्थांना नियमित स्वच्छ पाणी पुरविण्यासाठी महत्त्वाकांक्षी योजना या गावात पूर्ण झाली आहे.
प्रधानमंत्री आवास योजना व रमाई योजनेंतर्गत घरकूल बांधकामासाठी प्रत्येकी पाच कुटुंबांना १ लाख २० हजार रुपये देऊन हक्काचा निवारा उपलब्ध करून देण्यात येत असून, २२ कुटुंबांना पट्टे वाटप करण्यात आले आहेत.
सरासरी साडेचार हजार लोकसंख्या असलेल्या या गावाच्या नागरिकांना चांगल्या व दर्जेदार नागरी सुविधा देण्यासोबतच स्वच्छ पिण्याचे पाणी देण्यासाठी ‘आरओ’ मशीनसुद्धा बसविण्यात आले आहे. खासदार निधी तसेच आमदार समीर मेघे यांच्या निधीमधूनही विविध विकास कामे सुरू असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार म्हणून दत्तक घेतलेले फेटरी हे गाव विकासाचे मॉडेल ठरले आहे.
गावाला सातत्याने योजनांचा लाभ
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटरी गावाची आमदार आदर्श गाव म्हणून निवड केल्यापासून सातत्याने विविध योजनांचा लाभ गावाला मिळत आहे. दलित वस्त्यांमध्ये रस्ते, पिण्याचे पाणी, विद्युत तसेच घरोघरी शौचालय बांधणे उपक्रम ग्रामपंचायतमार्फत राबविल्यामुळे गावाच्या स्वच्छतेसोबतच १०० टक्के हागणदारीमुक्त झाले आहे. अमृता फडणवीस यांनी सातत्याने गावाला भेट देऊन महिलांच्या आरोग्यासोबतच रस्ते, पाणी, वीज, मुलांना चांगले शिक्षण तसेच येथील बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. गावात योजना राबवीत असताना नागरिकांच्या सामाजिक व आर्थिक विकासाकडे विशेष लक्ष दिले. अंगणवाडीच्या दोन सुसज्ज इमारती, ग्रामपंचायत भवन, सांस्कृतिक भवन, घनकचरा व्यवस्थापन आदी योजना विविध उद्योगांच्या सहकार्य तसेच सामाजिक दायित्व निधीतून पूर्ण झाल्या आहेत. महिलांना शिलाईचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचा यशस्वी उपक्रम राबविला आहे.
- ज्योती राऊत, सरपंच, फेटरी.

डिजिटल अंगणवाडी,
बालोद्यान, ग्रीन जीम फेटरीचे आकर्षण

नागपूर सुधार प्रन्यासतर्फे अंगणवाडीच्या परिसरात बालोद्यान, ग्रीन जीम तसेच वॉकिंग ट्रॅक हे फेटरीचे आकर्षण ठरत असून वृक्षारोपणाच्या कार्यक्रमांतर्गत दोन एकर झुडपी जंगलात एक हजार वृक्ष लावण्यात आले तर स्मशानभूमीचे सौंदर्यीकरण करून तेथे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केल्याने नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. यासाठी १० लाख रुपये खर्च करण्यात आले आहे. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत शेतीला शाश्वत सिंचनाचा लाभ देण्यासाठी १९ लाख ५२ हजार, लायब्ररीसाठी २५ लाख रुपये, स्मशानभूमीच्या विकासासाठी १० लाख रुपये तसेच ग्रामपंचायततर्फे सिंमेट रस्ते, भूमिगत नाली या योजनासुद्धा यशस्वीपणे राबविण्यात आल्या आहेत.
 

Web Title: Ideal model of Chief Minister's Fatere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.