नागपुरात पार पडला आदर्श निकाह; स्वागत समारंभही रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 05:05 PM2020-04-21T17:05:25+5:302020-04-21T17:05:45+5:30
सधन आणि शिक्षित मुस्लिम कुटुंबातील मुला-मुलीचा निकाह आदर्श पद्धतीने करून संपूर्ण लग्न व स्वागत समारंभाचा खर्च गोरगरिबांच्या भोजनासाठी देण्यात आला. विशेष म्हणजे, वर-वधू आणि मौलवींसह केवळ पाच जण या निकाहला हजर होते आणि त्या सर्वांनीच ‘सोशल डिस्टन्सिंग’चेही पालन केले.
नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सधन आणि शिक्षित मुस्लिम कुटुंबातील मुला-मुलीचा निकाह आदर्श पद्धतीने करून संपूर्ण लग्न व स्वागत समारंभाचा खर्च गोरगरिबांच्या भोजनासाठी देण्यात आला. विशेष म्हणजे, वर-वधू आणि मौलवींसह केवळ पाच जण या निकाहला हजर होते आणि त्या सर्वांनीच ‘सोशल डिस्टन्सिंग’चेही पालन केले.
बाबा ताज कॉलनीत राहणाऱ्या शमा आणि मुमताज काझी यांचे चिरंजीव मोहसिन काझी यांचा निकाह अफरोज बानो बशीर अहमद शेख यांची मुलगी नसरीन शेख हिच्यासोबत ५ एप्रिलला पार पडणार होता. मात्र, लॉकडाऊन घोषित झाल्यामुळे विवाहाची झालेली संपूर्ण तयारी जागच्या जागीच राहिली. हा निकाह पुढे ढकलण्यात आला. दोन आठवड्यानंतर लॉकडाऊन संपेल, अशी अपेक्षा होती. तो संपल्यानंतरच हा निकाह करण्याचे ठरले होते. परंतु कोरोनाचा प्रकोप वाढतच असल्याने हा निकाहही आणखी लांबण्याची शक्यता निर्माण झाली. ती लक्षात घेता दोन्ही कुटुंबीय तसेच त्यांच्या नातेवाईकांनी विचारविमर्श करून साध्या पद्धतीने निकाह पार पाडण्याचे ठरविले. त्यानुसार १८ एप्रिलला सायंकाळी ५ च्या सुमारास वर-वधू आणि त्यांच्या कुटुंबातील प्रत्येकी एक व्यक्ती तसेच मौलवी अशा एकूण पाच जणांच्या उपस्थितीत हा निकाह पार पडला.
विशेष म्हणजे, निकाहदरम्यान वर-वधूसह सर्वांनी ‘सोशल डिस्टन्सिंग’चेही पालन केले. प्रत्येकाच्या तोंडावर मास्कही होता. आधी ठरल्याप्रमाणे निकाहच्या दुसºया दिवशी मोठा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. परंतु लॉकडाऊनमुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता तो रद्द करून लग्न तसेच स्वागत समारंभावर येणारा संपूर्ण खर्च उत्तर नागपुरातील मुस्लिम वस्त्यांमधील गरिबांच्या भोजनदानावर खर्च करण्यात आला.