अभिव्यक्तीसाठी विचार प्रगल्भ हवेत : विजय दर्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 12:53 AM2018-02-23T00:53:45+5:302018-02-23T00:57:07+5:30
माध्यम कुठलेही असो अभिव्यक्तीसाठी आधी विचार प्रगल्भ व्हायला हवेत. ही प्रगल्भता मनाच्या एकाग्रतेतूनच शक्य आहे. त्यामुळे चित्रकारांनी कुंचला हातात घेण्याआधी मन शांत आणि एकाग्र ठेवले पाहिजे, असे विचार लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : माध्यम कुठलेही असो अभिव्यक्तीसाठी आधी विचार प्रगल्भ व्हायला हवेत. ही प्रगल्भता मनाच्या एकाग्रतेतूनच शक्य आहे. त्यामुळे चित्रकारांनी कुंचला हातात घेण्याआधी मन शांत आणि एकाग्र ठेवले पाहिजे, असे विचार लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांनी व्यक्त केले. जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीतर्फे रामबेगी येथे घेण्यात आलेल्या आर्ट कॅम्पमध्ये कलावंतांनी जी चित्रे साकारली या चित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवारी झाले. या उद्घाटनीय कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बॉम्बे आर्ट सोसायटीचे अध्यक्ष व विख्यात चित्रकार वासुदेव कामथ, ज्येष्ठ चित्रकार प्रमोदबाबू रामटेके प्रामुख्याने उपस्थित होते. विजय दर्डा पुढे म्हणाले, आज संपूर्ण जगात चित्रकलेचे तंत्र बदलत आहे. हे तंत्र या क्षेत्रातील नवोदितांनीही शिकले पाहिजे. कलावंतामध्ये जिद्द असली पाहिजे. एम. एफ. हुसेन यांनी चक्क रस्त्यावर बसून काम केले. पुढे ते आपल्या प्रतिभेच्या बळावर महान चित्रकार झाले. असे दर्जेदार चित्रकार घडविण्यासाठी जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. आता येथील विद्यार्थ्यांचे चित्र विदेशात गेले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. प्रमोदबाबू रामटेके म्हणाले, निसर्ग चित्रणात चित्रकलेचे मूळ आहे, कारण यात जे समोर दिसते ते रेखाटले जाते. प्रत्येक कलावंताचे चित्र वेगळे असते, कारण ते काढण्यामागे प्रत्येकाची मनोभूमिका वेगळी असते. या कार्यक्रमात पाहुण्यांच्या हस्ते ज्येष्ठ चित्रकारांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये दिलीप भालेराव, श्याम डोंगरवार, नितीन पाटील, अजय रायबोले, सुनील पुराणिक, भारत सलाम, किरण पराते, दयानंद रामटेके, संजय मालधुरे, प्रफुल डेकाटे व समीर देशमुख यांचा समावेश होता. यावेळी निसर्ग चित्रण स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
यांनी जिंकले पुरस्कार
प्रथम- सुमित ब्राम्हणकर
द्वितीय - शिवराज टिटमे
तृतीय - नंदकिशोर सालवटकर
चतुर्थ - करण कवाडे
पाचवे - स्वप्निल रामागडे
उत्तेजनार्थ - रोहित मानेक
उत्तेजनार्थ - श्रीपाद भोंगाडे
उत्तेजनार्थ - स्वप्निल शिरूकर
चित्र कुठे थांबवायचे हे कळले पाहिजे
निसर्ग चित्रण करताना अनेकदा कलावंत वाहवत जातात. नदी, पहाड, सूर्य, पक्षी असे सारेच समोर दिसत असल्याने चित्रचा आकार वाढतो. परिणामी दर्जा खालावतो. त्यामुळे एखादवेळी चित्रत काही उणो झाले तरी चालेल अतिरिक्त मात्र काहीच होऊ नये. चित्र काढताना आपण कुठे थांबायला हवे याचे ज्ञान चित्रकाराला असले पाहिजे, असे विचार विख्यात चित्रकार वासुदेव कामत यांनी व्यक्त केले. कलावंत व समाज यांच्यातील अदृश्य दरी भरून काढण्याचे काम निसर्ग चित्रण करते. कारण, हे चित्रण करताना चित्रकार प्रत्यक्ष लोकांमध्ये मिसळत असतो. निसर्ग चित्रण हा विषय केवळ हायस्कूलच्या सबमिशनपुरता मर्यादित नाही. या चित्रंमध्ये प्राण ओतायचे असतील तर रानावनात भटकावे लागेल, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.