नागपूरच्या संत्र्याची ओळख जगात पोहचेल : गजेंद्रसिंह शेखावत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 09:04 PM2017-12-16T21:04:20+5:302017-12-16T21:20:25+5:30

‘लोकमत’ने आयोजित केलेला या ‘फेस्टिव्हल’मुळे नागपूर व येथील संत्रा जगभरात पोहोचेल, असा विश्वास केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी व्यक्त केला.

The identification of the oranges of Nagpur will reach the world: Gajendra Singh Shekhawat | नागपूरच्या संत्र्याची ओळख जगात पोहचेल : गजेंद्रसिंह शेखावत

नागपूरच्या संत्र्याची ओळख जगात पोहचेल : गजेंद्रसिंह शेखावत

Next
ठळक मुद्देशेतकरी, उद्योग व सरकारने एकत्र यावे : राजूभाई श्रॉफअ‍ॅग्रोटुरिझमचे धोरण आखणार : जयकुमार रावलपाच वर्षांत जगातील महत्त्वाचा ‘फेस्टिव्हल’ बनणार : विजय दर्डा

ऑनलाईन लोकमत
नागपूर : भारतात १६ लाख हेक्टरवर संत्र्याचे ४० लाख टन उत्पादन होते, तर ब्राझीलमध्ये तेवढ्याच क्षेत्रावर भारताच्या पाचपट संत्रा उत्पादन होते. त्यामुळे देशातील संत्रा उत्पादन वाढविणे हे एक मोठे आव्हान आहे. वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’च्या माध्यमातून नागपूरची ओळख असलेला संत्रा जगात पोहोचविण्यासाठी पहिले पाऊल टाकण्यात आले आहे. २०२२ पर्यंत देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे, असा पंतप्रधानांचा संकल्प आहे. यादिशेने आता वाटताल सुरू झाली आहे, असे मत केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी व्यक्त केले.
स्वातंत्र्याच्या काळात देशाची अन्नाची गरज भागविण्यापुरतेही उत्पादन नव्हते. त्यानंतर कृषी तज्ज्ञांनी केलेल्या संशोधनाच्या बळावर अतिरिक्त उत्पादन होऊन देश निर्यात करू लागला. देशातील शेतजमिनीच्या ४० टक्के जमिनीवर गहू, तांदळाचे पीक घेतले जाते. यापासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा एकूण उत्पन्नात वाटा १६ ते १८ टक्के आहे तर १८ टक्के जमिनीवर फळ, भाजीपाला लावला जातो. मात्र, त्याचा उत्पन्नातील वाटा ४० टक्के आहे. भारतात सर्वच प्रकारचे उत्पादन होऊ शकते. मात्र, जगाची मागणी विचारात घेऊन शेतकऱ्यांनी उत्पादन घ्यावे. राजस्थानमध्ये पाणीटंचाई आहे. असे असले तरी तेथे एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केलेली नाही. कारण, तेथील शेतकऱ्यांनी शेतीला दुसरे पर्याय निवडले. दुग्ध व्यवसाय, पशुपालन, मध गोळा करणे अशा जोडधंद्याकडे लोक वळले. शेतीवरचा भार कमी केला. गुजरातमध्ये अमूलने महिलांची अर्थव्यवस्था सुधारली. असेच प्रयोग सर्वत्र झाले तर शेतकरी निश्चितच संपन्न होईल, असेही त्यांनी सांगितले.
‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’ येथील संत्र्याची जगात ओळख निर्माण करेल. येथील संत्र्याचा सुगंध जगात दरवळेल, असा विश्वास व्यक्त करीत यासाठी केंद्र सरकार सर्वोतोपरी मदतीसाठी तयार आहे, असेही त्यांनी आश्वस्त केले.

शेतकरी, उद्योग व सरकारने एकत्र यावे : राजूभाई श्रॉफ
 कृषी उत्पादनात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. हे शेतकऱ्यांचे यश आहे. येथील शेतकरी हुशार व मेहनती आहे. तो कमीतकमी रासायनिक खते वापरतो. शेतकरी शिकण्यास तयार आहे. त्याला मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे. गेल्या काही वर्षांत फळ, भाजीपाल्याचे उत्पादन वाढले. फळांमध्ये महाराष्ट्र पुढे गेला. पाणी, वीज तंत्रज्ञान, गोदाम शेतकऱ्याला उपलब्ध करून दिले तर तो निश्चितच प्रगती करेल. शेतकरी, उद्योग व सरकारने एकत्र येत यासाठी काम केले तर कृषी क्षेत्राला नक्कीच यश मिळेल, असा विश्वास ‘यूपीएल’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजूभाई श्रॉफ यांनी व्यक्त केला. ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’नंतर येथील संत्रा जगात पोहोचवायला मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.

अ‍ॅग्रोटुरिझमचे धोरण आखणार : जयकुमार रावल
राज्यातील पर्यटन वाढावे यासाठी शेतकऱ्यांना जोडण्याचा प्रयत्न केला जाईल. जगभरातील लोकांना आपल्या शेतीवर आणण्याचे प्रयत्न केले जातील, यासाठी अ‍ॅग्रोटुरिझमचे धोरण आखले जाईल, असे राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.
देशातील व राज्यामध्ये पर्यटनाच्या अपार संधी उपलब्ध आहेत. कृषी उद्योगाप्रमाणेच पर्यटनदेखील रोजगाराचे सर्वात मोठे साधन होऊ शकते. लोक जगात पर्यटनासाठी जातात. मात्र आपल्या राज्यातच काय नैसर्गिक खजिना आहे, याची माहिती नसते. ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’मध्ये इस्रायल, टर्की, दक्षिण आफ्रिका आदी देशातील प्रतिनिधींनी भाग घेतला आहे. पुढील काळात हा महोत्सव आंतरराष्ट्रीयस्तरावर आणखी प्रसिद्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पाच वर्षांत जगातील महत्त्वाचा ‘फेस्टिव्हल’ बनणार : विजय दर्डा
नागपूरची ओळख संत्रानगरी म्हणून आहे. या संत्र्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी ‘लोकमत’कडून हा पुढाकार घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांमध्ये जागरूकता यावी, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळावीत व जग संत्र्याकडे आकर्षित व्हावे, हा आयोजनामागचा उद्देश आहे. पुढील पाच वर्षांत ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’ जगातील महत्त्वाचा उत्सव बनेल व जगभरातून येथे लोक येतील, असे प्रतिपादन लोकमत मीडिया ग्रुपचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांनी प्रास्ताविकातून केले.
दर्डा म्हणाले, कृषी विद्यापीठांमधून संत्र्यासारख्या फळांच्या विकासासाठी संशोधन होणे अभिप्रेत आहे. मात्र प्रत्यक्षात ही विद्यापीठे पांढरा हत्ती बनली असून, शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले नाही. म्हणूनच गडकरींना चीड येते, असे सांगत त्यांनी गडकरींच्या भूमिकेचे समर्थन केले. विद्यापीठे जे करू शकत नाही, त्याहून जास्त बदल व संशोधन उद्योग क्षेत्र घडवून आणू शकते. इतर प्रगत देशांच्या धर्तीवरच ‘अ‍ॅग्रोटुरिझम’ला आपण प्राधान्य दिले पाहिजे. देश-विदेशातील पर्यटकाला आपण येथील संत्रा बगीचे दाखवायला न्यावे. यासाठी गडकरी व कृषी राज्यमंत्री शेखावत यांनी पुढाकार घेऊन पंतप्रधानांना सांगावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे, जयकुमार रावल, मदन येरावार यांनी या ‘फेस्टिव्हल’च्या आयोजनासाठी घेतलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.

‘लोकमत’च्या पुढाकाराचे कौतुक
 सर्वच मान्यवरांनी ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’ आयोजित करण्यासाठी ‘लोकमत’ने घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले. संत्र्याला वैश्विक ओळख निर्माण करून देण्याची आवश्यकता आहे. यासाठी ‘लोकमत’ने पाऊल उचलले ही अभिनंदनीय बाब आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले तर गडकरींनी याची आवश्यकता होतीच, असे म्हटले.‘लोकमत’ने आयोजित केलेला या ‘फेस्टिव्हल’मुळे नागपूर व येथील संत्रा जगभरात पोहोचेल, असा विश्वास केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी व्यक्त केला.

Web Title: The identification of the oranges of Nagpur will reach the world: Gajendra Singh Shekhawat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.