आत्मशक्तीला ओळखा
By Admin | Published: October 1, 2015 03:26 AM2015-10-01T03:26:58+5:302015-10-01T03:28:29+5:30
रामदासपेठ येथील सुमतिनाथ जीनालय जैन उपाश्रय येथे प्रवचन सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
आचार्य पूर्णचंद्र सुरीश्वरजी यांचे प्रवचन
नागपूर : रामदासपेठ येथील सुमतिनाथ जीनालय जैन उपाश्रय येथे प्रवचन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रवचनात आचार्य पूर्णचंद्र सुरीश्वर महाराज म्हणाले की, जैन मंदिराची शिल्पकला वैशिष्ट्यपूर्ण आहे. या शिल्पातून निघणाऱ्या तरंगामुळे साधक आत्मसाधनेत तल्लीन होऊन जातो. परमात्मा स्वयं प्रकाशित आहे. त्यामुळे शुद्ध तुपामध्ये दिव्याची प्रकाशित ज्योत शांत आणि शीतल होते. माँ शारदेची वंदना करताना आपण ‘सार दे’ मां असे संबोधतो. अर्थात हे माते आम्हाला विश्वातील सार आणि संस्कार प्रदान कर, ज्यामध्ये आमचे जीवन बहुजन हितासाठी संलग्नित व्हावे. क्रोध हा मनुष्याचा स्वभाव नाही. हिंसा करणे ही व्यक्तीची वृत्ती नसावी. अहिंसेतच मनुष्याचे जीवन आहे. एक शांत व्यक्ती आणि अशांत व्यक्तीसमोर एकसारखी परिस्थिती असल्यास त्यांच्या व्यवहारातील फरक सहज लक्षात येतो. संस्कारानुसार जीवन जगण्यासाठी केवळ माहिती गोळा करून चालणार नाही, तर जीवन-व्यवहारात संस्कार जोपासावे लागतील. आत्मा अनंत ज्ञानी आहे आणि आपल्या सुप्त शक्ती विशिष्ट परिस्थितीतच समोर येतात. रुग्णालयात आजार शय्येवर असलेला व्यक्ती आग लागल्याची माहिती मिळताच स्वत:ला वाचविण्यासाठी पळत सुटतो. वाघ समोर असेल तर वृद्ध आणि अशक्त असलेला व्यक्तीही धावायला लागतो. तसाच तपस्या करणारा कमजोर मनुष्यही विशेष शक्ती मिळाल्याचा अनुभव करू शकतो. ही आत्मशक्तीच आहे. आपल्यामध्येच असलेली ही शक्ती ओळखावी लागेल. भगवंत आणि गुरूच्या कृपेनेच ही आत्मशक्ती ओळखणे शक्य होईल. या आत्मशक्तीच्या उपयोगातून जीवन सार्थक बनेल.(प्रतिनिधी)