अजूनही पटली नाही ‘त्या’ मृतदेहाची ओळख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 11:16 PM2020-09-10T23:16:28+5:302020-09-10T23:17:52+5:30
कोरोना रुग्णांसाठी तयार करून ठेवलेल्या विशेष कोचमध्ये बुधवारी एका व्यक्तीचा कुजलेला मृतदेह आढळून आल्याने रेल्वेस्थानकावर खळबळ उडाली. नागपूर रेल्वेस्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक ७ वर ही घटना उघडकीस आली. साधारण महिनाभरापासून हा मृतदेह येथे असावा, असा अंदाज असून अद्यापही हा मृतदेह कोणाचा आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना रुग्णांसाठी तयार करून ठेवलेल्या विशेष कोचमध्ये बुधवारी एका व्यक्तीचा कुजलेला मृतदेह आढळून आल्याने रेल्वेस्थानकावर खळबळ उडाली. नागपूर रेल्वेस्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक ७ वर ही घटना उघडकीस आली. साधारण महिनाभरापासून हा मृतदेह येथे असावा, असा अंदाज असून अद्यापही हा मृतदेह कोणाचा आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही.
कोरोनासाठी रेल्वे विभाग सज्ज आहे. गरज पडल्यास उपाययोजना म्हणून रेल्वेने कोरोना संशयितांसाठी रेल्वेचे कोच तयार ठेवले होते. हे संपूर्ण कोच नागपूर रेल्वेस्थानकाच्या यार्डात ठेवले होते. बुधवारी सकाळच्या सुमारास संपूर्ण कोच स्वच्छ करण्यासाठी वाहशिंग यार्डात आणले असता प्रचंड दुर्गंधी पसरली. रेल्वे कर्मचाऱ्यांना संशय येताच त्यांनी या घटनेची माहिती आरपीएफ नियंत्रण कक्षाला दिली. नियंत्रण कक्षाकडून लोहमार्ग पोलीस मुख्यालयाला ही माहिती दिली. अमृतसर गाडीच्या (कोच नंबर १३२२३) बर्थखाली हा मृतदेह कुजलेल्या स्थितीत होता. लोहमार्ग पोलिसांनी आणि रेल्वे डॉक्टरांनी घटनास्थळी भेट दिल्यावर आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास हेड कॉन्स्टेबल ऑज्वेल थॉमस यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. लोहमार्ग पोलिसांनी गुरुवारी दिवसभर शोध घेण्याचा प्रयत्न करूनही तो कोणाचा आहे, याची माहिती मिळू शकली नसल्याची माहिती ठाणेदार सतीश जगदाळे यांनी दिली.
ऑज्वेल थॉमस यांनी कुजलेल्या मृतदेहाचा केला पंचनामा
या कुजलेल्या पार्थिवाला हात लावण्यासाठी कोणीही पुढे जात नव्हते. दुर्गंधीमुळे घटनास्थळी उभे राहणेही कुणाला शक्य नव्हते. अशा स्थितीत हेड कॉन्स्टेबल ऑज्वेल थॉमस यांनी पीपीई किट घालून मृतदेहाचा पंचनामा केला.
८ वर्षापूर्वीच्या घटनेची पुनरावृत्ती
२०१२ साली राजनांदगाव येथून इतवारी रेल्वेस्थानकावर आलेल्या एका गाडीत मृतदेह होता. नंतर यातील काही कोच वेगळे करून ते मोतीबाग येथे आणल्या गेले. महिनाभराने प्रचंड दुर्गंधी सुटल्यावर ही घटना उघडकीस आली. या कोचमधील मृतदेह कुजलेल्या स्थितीत होता. विशेष म्हणजे तेव्हाही मृताची ओळख पटली नव्हती.