नागपुरात आदिमानवाची उत्क्रांती ते सॅटेलाईट तंत्राची मुलांना ओळख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 12:06 AM2018-01-18T00:06:38+5:302018-01-18T00:09:43+5:30

Identity of the evolution of the Adimanu to the children of the satellite system in Nagpur | नागपुरात आदिमानवाची उत्क्रांती ते सॅटेलाईट तंत्राची मुलांना ओळख

नागपुरात आदिमानवाची उत्क्रांती ते सॅटेलाईट तंत्राची मुलांना ओळख

Next
ठळक मुद्देरमण विज्ञान केंद्रात विज्ञान प्रदर्शन सुरू : केंद्रीय संशोधन संस्थांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मानवाच्या गरजेतून व पुढे कुतूहलातून विज्ञानाची निर्मिती झाली. लाखो वर्षापूर्वी गुहेत राहणारा माणूस आपल्या आवश्यकतेनुसार गोष्टी करीत गेला व त्यातून विज्ञान उलगडत गेले. या कुतूहलाने मानवाला अंतराळात सॅटेलाईट वापरापर्यंत नेले आहे. पुढे संस्थागत रुपातून समाजोपयोगी संशोधनाला चालना मिळाली. या सर्व बदलांची आणि शासकीय संस्थांद्वारे चालणाऱ्या  लोकोपयोगी संशोधन व विकासकार्याची ओळख करून देणाऱ्या  विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन रमण विज्ञान केंद्राच्यावतीने करण्यात आले.
बुधवारी या विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन  करण्यात आले. विशेष बाब म्हणजे केंद्रीय स्तरावर भूविज्ञानापासून अंतराळात संशोधन करणाऱ्या  संस्थांच्या संशोधन कार्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न यामध्ये केला गेला आहे. मुलांना आकाशात फिरणारे विमान, रॉकेटचे कुतूहल असते त्यानुसार प्रदर्शनातील भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)चा स्टॉल मुलांच्या आकर्षणाचे केंद्र ठरला आहे. आकाशातून खोल समुद्राचे रहस्य सांगणारा भारतीय बनावटीचा ‘ओसीन सॅटेलाईट-१’ तसेच सॅटेलाईट अंतराळात सोडणाऱ्या  जीएसएलव्ही, पीएसएलव्ही या लॉन्चरची प्रतिकृती विद्यार्थी कुतूहलाने न्याहाळताना दिसतात. इस्रोच्या कार्याची माहिती देणाऱ्या इतरही गोष्टी विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधनाकडे प्रवृत्त करणाऱ्या  ठरत आहेत. इस्रोला लागून असलेला भारतीय मानवविज्ञान सर्व्हेक्षण संस्थेचा स्टॉल मुलांचे कुतूहल वाढविणारा आहे. गुहेत राहत असतानापासून हजारो, लाखो वर्षात मानवामध्ये झालेले शारीरिक, मानसिक, सांस्कृतिक आणि शेतीविषयक बदलाची माहिती या स्टॉलच्या माध्यमातून मिळत आहे. विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातून याची माहिती होत असते, मात्र संस्थेद्वारे या दृष्टीने प्रत्यक्ष चालणाऱ्या संशोधन कार्याची माहिती विद्यार्थ्यांना होत आहे. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण केंद्रातर्फे असलेला स्टॉलही आकर्षणाचा केंद्र आहे. लाखो वर्षापूर्वी पृथ्वीवर अस्तित्वात असणाºया डायनासोरचे अंडे, त्या काळातील अवशेष, विदर्भासह देशात विविध ठिकाणी आढळणारे खडक, त्यातून मिळाणारे उपयोगी खनिज पदार्थ, वातावरणामुळे खडकांमध्ये होणारे बदल, अशा पृथ्वीच्या गर्भात दडलेल्या एक ना अनेक रहस्यमय अवशेषांची माहिती विद्यार्थ्यांना अभ्यास आणि कुतूहलाच्या दृष्टीनेही महत्त्वाची ठरत आहे. केंद्रीय कापूस संशोधन संस्था (सीआयसीआर) च्या स्टॉलवर कापसाच्या प्रजाती व शेती संशोधनाची ओळख मिळत आहे.
याशिवाय पर्यावरणपूरक गोष्टी अंगिकारणारे वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडचे कार्य मुलांना समजायला मिळत आहे.
न्यूक्लियर पॉवरच्या शांततामय संशोधनाची ग्वाही देणाऱ्या  न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन आॅफ इंडियाच्या स्टॉलवर वीजनिर्मितीसाठी चालणारी प्रक्रिया प्रत्यक्ष उपकरणाद्वारे दाखविण्यात येत आहे. याशिवाय नीरी, मॉयल लिमिटेड, केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था, मिनरल एक्सप्लोरेशन कार्पोरेशन लिमिटेड, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, परमाणु खनिज अन्वेषण व संशोधन संस्था, भारतीय ताप प्रशीतन व वातानुकूलन अभियंता संघ, अशा १५ संशोधन संस्थांची माहिती देणारे स्टॉल या प्रदर्शनात लावले असून प्रत्येक संस्थेच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालणारी ठरत आहे. त्यामुळे प्राथमिक शाळेपासून अभियांत्रिकी महाविद्यालयापर्यंतचे शेकडो विद्यार्थी दररोज या प्रदर्शनाला भेट देत आहेत.
 २१ पर्यंत चालणार प्रदर्शन
बुधवारी या विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन  झाले. यावेळी परमाणु खनिज अन्वेषण व संशोधन संस्थेचे क्षेत्रिय निर्देशक डॉ. एस. श्रीनिवास, भारतीय भूवैज्ञानिक सर्व्हेक्षणचे अप्पर महानिदेशक एन. नटेसन व रमण विज्ञान केंद्राचे प्रकल्प समन्वयक एन. रामदास अय्यर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले. हे प्रदर्शन २१ जानेवारीपर्यंत चालणार आहे.

Web Title: Identity of the evolution of the Adimanu to the children of the satellite system in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.