चुकून पाळणा हलला तर ...
By admin | Published: July 20, 2016 02:00 AM2016-07-20T02:00:48+5:302016-07-20T02:00:48+5:30
लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी जगभर प्रयत्न सुरू आहेत. कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया फसल्यामुळेच पाळणा हलला, अशी
जितेंद्र ढवळे ल्ल नागपूर
लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी जगभर प्रयत्न सुरू आहेत. कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया फसल्यामुळेच पाळणा हलला, अशी ओरड ग्रामीण भागात आजही आहे! त्यामुळे आता चुकून पाळणा हलला तर सरकारच संबंधित स्त्री अथवा पुरुषाला नुकसान भरपाई देणार आहे.
सर्वोच्च न्यायालयात कुटुंब कल्याण शस्त्रक्रियासंदर्भात एक याचिका दाखल करण्यात आली होती. तीत न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार केंद्र सरकारने कुटुंब नियोजन विमा योजना चालू केली आहे. सरकारने यासंदर्भात मार्गदर्शक सूचना राज्यांसाठी जारी केल्या आहेत. यात कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया फसल्यास (अयशस्वी) झाल्यास संबंधित व्यक्तीला सरकारकडून ३० हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात येईल. यासोबतच संबंधित व्यक्तीचा रुग्णालयात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेशी संबंध लावण्याजोग्या कारणामुळे मृत्यू झाल्यास किंवा रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर सात दिवसांच्या आत मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये नुकसान भरपाई मिळेल. शस्त्रक्रिया झाल्यानंतर ८ ते ३० दिवसांच्या आत मृत्यू झाल्यास ५० हजार रुपये भरपाई दिली जाईल.यासोबतच कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करतेवेळी गुंतागुंत झाल्यास किंवा शस्त्रक्रिया झाल्यानंतर डिस्चार्ज दिल्यानंतर ६० दिवसांच्या कालावधीत कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेशी संबंध लावण्याजोग्या कारणामुळे गुंतागुंत झाल्यास २५ हजार रुपये भरपाई देण्यात येईल.