शास्त्रोक्त पद्धतीने पशुपालन केल्यास आत्महत्यांवर बसेल अंकुश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:06 AM2021-06-05T04:06:32+5:302021-06-05T04:06:32+5:30
नागपूर : विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचे विश्लेषण केल्यास, आपला शेतकरी एकाच व्यवसायावर विसंबून असल्याचे स्पष्ट होते. अशावेळी पूरक व्यवसायाची गरज ...
नागपूर : विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचे विश्लेषण केल्यास, आपला शेतकरी एकाच व्यवसायावर विसंबून असल्याचे स्पष्ट होते. अशावेळी पूरक व्यवसायाची गरज आहे. पशुपालन हा अत्यंत फायदेशीर व सोपा उपाय आहे आणि त्याला शास्त्रोक्त जोड दिली तर शेतकरी आत्महत्यांवर बऱ्यापैकी अंकुश लावता येईल, असे मत पंजाबराव कृषी विद्यापीठातील प्राध्यापक व संशोधक डॉ. किशोर बिडवे यांनी व्यक्त केले.
जागतिक हवामान बदलत आहे आणि खरिपाच्या हंगामात पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होत असतो. अवकाळी पाऊस आला की, हातातोंडाशी आलेले पीक नष्ट होते. जो शेतकरी केवळ शेतीवर विसंबून असतो तो तणावापोटी आत्महत्येचे पाऊल उचलतो. त्यासाठी दैनंदिन खर्च निघू शकेल, असा पूरक व्यवसाय गरजेचा आहे. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये विदर्भापेक्षा पावसाची सरासरी अर्ध्याहून खाली आहे. तरीही तो भाग समृद्ध आहे आणि त्याचे कारण तेथील शेतकरी पशुपालन करतो, हे असल्याचे बिडवे यावेळी म्हणाले. ग्रामायण प्रतिष्ठानच्या कृषी प्रबोधन अभियानात ते बोलत होते. सुमीत माईणकर यांनी डॉ. बिडवे यांचा परिचय करून दिला, तर डॉ. संजय सराफ यांनी आभार मानले.
.................