बेड वाढले तर १५ हजार अतिरिक्त ऑक्सिजन सिलिंडरची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:08 AM2021-04-14T04:08:30+5:302021-04-14T04:08:30+5:30
राजीव सिंह / लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर जिल्ह्यात दररोज ३५ ते ४० हजार ऑक्सिजन सिलिंडरचा खप होत ...
राजीव सिंह / लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर जिल्ह्यात दररोज ३५ ते ४० हजार ऑक्सिजन सिलिंडरचा खप होत आहे. ज्या वेगाने रुग्ण वाढत आहेत, त्या अनुषंगाने बेड्सची व्यवस्था केल्यास १५ हजार अतिरिक्त ऑक्सिजन सिलिंडरची गरज पडणार आहे. परंतु, अपेक्षित प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्याने बेडची संख्या वाढवली जात नाही, अशी स्थिती आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाच्या दाव्यानुसार नागपुरात १०० ते १०५ मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा होत असून, बेडच्या हिशेबाने ऑक्सिजनचा तुटवडा सद्यस्थितीत नाही.
वर्तमानात दररोज साडेपाच ते सहा हजार संक्रमित रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे ऑक्सिजनबाबत प्रचंड मारामारी सुरू आहे. कांद्री (कन्हान) येथील एका इस्पितळात ऑक्सिजनच्या अभावामुळे चार संक्रमितांचा मृत्यू झाल्याचे प्रकरण पुढे येताच, जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. जिल्ह्यात जवळपास १४,२४४ रुग्ण विविध सरकारी व खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.
जाणकारांच्या अनुसार, नागपुरात एका सिलिंडरमध्ये सहा हजार लिटर ऑक्सिजन असतो. नागपुरात प्रामुख्याने आयनॉक्स कंपनी आणि भिलाईच्या कंपनीकडून ऑक्सिजनचा पुरवठा होताे. यासोबतच सहा लहान पुरवठादार आहेत. चंद्रपुरात ४०० सिलिंडर ऑक्सिजनची व्यवस्था होत आहे. नागपुरात ऑक्सिजनचा तुटवडा असतानाही चंद्रपरला दररोज १२०० सिलिंडर नागपुरातून पाठविले जात आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांची चर्चा करून विदर्भातील जिल्ह्यांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे आवाहन केल्याचे सांगण्यात येत आहे.
------------------
पुरवठ्यासाठी चार कंपन्या सज्ज
ऑक्सिजनची वाढत्या मागणीसोबत चार कंपन्यांनी जिल्हा प्रशासनाला पुरवठा करण्यास होकार कळवला आहे. यात वर्धा येथील उत्तम गालवा, लॉयड स्टील, भंडारा येथील सन फ्लॅग आणि छत्तीसगड येथील भिलाई स्टील प्लांटचा समावेश आहे. या कंपन्यांकडून जास्तीत जास्त पुरवठ्याची मागणी करण्यात आली आहे.
----------------
तुटवडा नाही, केवळ उपयोगाची दिशा ठरवावी लागेल
नागपुरात ऑक्सिजनचा तुटवडा नाही. दररोज १०० ते १०५ मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. ऑक्सिजनचा उपयोग योग्य तऱ्हेने होत नसल्याने ते वाया जात असल्याचे नागपूरचे निवासी उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे यांनी सांगितले. उदाहरणस्वरूप, जेव्हा रुग्ण जेवणासाठी ऑक्सिजन मास्क काढतो, तेव्हा तो ऑक्सिजनचा नॉब बंद करत नाही. यामुळे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन वाया जातो. कांद्री येथे ज्या चार रुग्णांचा मृत्यू झाला, ते गंभीर अवस्थेत हाते. त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाला. ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला नाही, असे कातडे यांनी सांगितले.
------------
मेयो-मेडिकलमध्ये पुरवठा सुरळीत
मेयो आणि मेडिकल कॉलेजमध्ये सर्वाधिक संक्रमित भरती आहेत. परंतु, येथे सद्यस्थितीत ऑक्सिजनचा तुटवडा नसल्याचा दावा कॉलेज प्रशासनाने केला आहे. मेडिकलमध्ये दररोज १२ हजार ते १३ हजार क्युबिक मीटर ऑक्सिजनची गरज आहे. येथे २०० जंबो सिलिंडरद्वारेही ऑक्सिजन पुरविला जात आहे. सामान्य दिवसांत ५०० क्युबिक मीटर ऑक्सिजनची गरज पडत होती. मेडिकलमध्ये लिक्विड ऑक्सिजन प्लांट असल्याने वर्तमानात ऑक्सिजनचा तुटवडा नसल्याचे मेडिकलचे अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी सांगितले. मेयोमध्येही रुग्णांची संख्या वाढल्यानंतरही पर्याप्त मात्रेत ऑक्सिजन उपलब्ध असल्याचे मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांनी सांगितले. येथे दररोज २६.५० किलोलिटर लिक्विड ऑक्सिजनचा खप होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
------------
रुग्ण वाढताच मागणी वाढली
- सप्टेंबर महिन्यात नागपुरात ऑक्सिजनची मागणी ६० मेट्रिक टनपर्यंत पोहोचली होती. नोव्हेंबरमध्ये संक्रमितांची संख्या घसरण्यासोबतच मागणी ३० ते ३५ मेट्रिक टनपर्यंत घसरली होती.
- मार्च महिन्यात पुन्हा संक्रमितांची संख्या वेगाने वाढली. मार्च महिन्यात ७६,२५० संक्रमित आढळून आले आणि ७६३ मृत्यूंची नोंद झाली. यासोबतच ऑक्सिजनचा मागणी वाढायला लागली.
- एप्रिलच्या पहिल्या १३ दिवसात एकूण ६५,००५ संक्रमित आढळले आहेत आणि ८०५ मृत्यूंची नोंद झाली आहे. यासेाबतच ऑक्सिजनची मागणी वाढून १०० ते ११० मेट्रिक टनपर्यंत पोहोचली आहे.
......