कटुता संपली नाही तर पुढील पिढ्यांचे नुकसान !
By admin | Published: June 4, 2016 02:38 AM2016-06-04T02:38:08+5:302016-06-04T02:38:08+5:30
काश्मीर मुद्दा हा भारत-पाकिस्तान मधील समस्येचे मूळ आहे. या मुद्यावर दोन्ही देशांनी शांतपणे विचार करण्याची आवश्यकता आहे.
अब्दुल बासित : दहशतवादाविरुद्ध पाकिस्तानची कडक भूमिका
नागपूर : काश्मीर मुद्दा हा भारत-पाकिस्तान मधील समस्येचे मूळ आहे. या मुद्यावर दोन्ही देशांनी शांतपणे विचार करण्याची आवश्यकता आहे. पाकिस्तानने दहशतवादाविरुद्ध कडक भूमिका घेतली आहे, अशी भूमिका पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी यावेळी मांडली.
भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान शांती प्रस्थापित व्हावी हेच उद्दिष्ट असले पाहिजे. यासाठी दोन्ही देशांनी एकत्रितपणे प्रयत्न केले पाहिजेत. जर दोन्ही देशांमधील कटुता संपली नाही तर पुढील पिढ्यांचे नुकसान होईल. भारत-पाक संबंध तुटता तुटत नाहीत आणि दोन्ही देश सोबतही राहत नाहीत.
दोन्ही देशांमधील दळणवळण सुविधा सुधारणे, पाकिस्तानचे चित्रपट तेथील मालिका भारतामध्ये दाखविल्या जाणे तसेच दोन्ही देशांमध्ये ‘व्हिसा’ची संख्या वाढविणे यासारख्या लहान लहान पुढाकारातून सकारात्मक वातावरण निर्मिती होऊ शकते, असा विश्वास अब्दुल बासित यांनी व्यक्त केला.
‘इंडिया अॅन्ड पाकिस्तान : अ डायलॉग विदाऊट बॉर्डर्स’चे आयोजन’
दहशतवाद पाकिस्तानच्या प्रगतीतील अडथळा
भारत-पाकिस्तान फाळणी झाल्यानंतर काही वर्षांतच हे देश एकत्र येतील असे अनेकांना वाटायचे. सुरुवातीच्या वर्षांमध्ये पाकिस्तानने फार वेगाने प्रगती केली. १९७० च्या दशकात तर पाकिस्तानचा विकास दर भारत आणि चीनपेक्षा जास्त होता. परंतु दहशतवादामुळे आमचे फार नुकसान झाले, असे अब्दुल बासित म्हणाले. पाकिस्तानमध्ये सोने, गॅस, दूध व इतर नैसर्गिक साधनसंपत्ती मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. परंतु जोपर्यंत देशात शांती प्रस्थापित होत नाही तोपर्यंत हवी तशी प्रगती करता येणे शक्य नाही, असे ते म्हणाले. प्रत्येक वेळी भारतात कुठला हल्ला झाला की पाकिस्तानकडे बोट दाखविण्यात येते. परंतु आम्हीदेखील दहशतावादाच्या विरोधातच लढतो आहोत, हे लक्षात घ्यायला हवे, असे बासित यांनी प्रतिपादन केले.
अफगाणिस्तान चिंतेचा विषय
१९७९ मध्ये सोव्हियत युनियनने अफगाणिस्तानवर हल्ला केला व त्यानंतर पाकिस्तानमध्ये दहशतवाद वाढीस लागला. अमेरिकेतील ९/११ नंतर तर स्थिती आणखी खराब झाली. अफगाणिस्तानातील दहशतवादाचा सर्वात जास्त आम्हाला फटका बसला. सुमारे ३० लाख अफगाण शरणार्थी पाकिस्तानातील शरणार्थी शिबिरांमध्ये राहत आहेत. दहशतवादामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवरदेखील परिणाम झाला. पाकिस्तान भारतासोबत संबंध सुधारावे यासाठी एकवेळ प्रतीक्षा करु शकतो परंतु अफगाणिस्तानमुळे निर्माण झालेली समस्या दूर करणे ही आमची प्राथमिकता आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
संबंध सुधारतील
दोन्ही देशांमध्ये अविश्वासाचे वातावरण आहे. हा अविश्वास आजच्या परिस्थितीमुळे आहे की १९४७, १९६५ व १९७१ च्या युद्धांमुळे आहे याचा विचार करण्याची गरज आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या भेटीनंतर संबंध सुधारण्याची आशा निर्माण झाली होती. परंतु पठाणकोट हल्ल्यामुळे त्यात अडथळे आले. २६/११ प्रमाणे पठाणकोट हल्ल्यावरची प्रतिक्रिया तीव्र नव्हती असे म्हणताना हे संबंध परत सुधारतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.